मुंबई (Mumbai) : बहुचर्चित नवी मंबई मेट्रोचे उद्घाटन आता २६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची दाट शक्यता आहे. २६ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरु असलेल्या कोंबडभुजे गावाजवळ महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमासाठी येणार आहेत. त्याचवेळी ते मेट्रो रेल्वेचे उदघाटन करुन मेट्रोची सफर करतील असे नियोजन आहे. प्रशासनाला ही तारीख निश्चित समजून नियोजन करण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्याचे समजते. याआधी १४ ते १७ ऑक्टोबर या दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मंबई मेट्रोचे उद्घाटन होईल अशी चर्चा होती.
बेलापूर ते पेंधर या मार्गावर नवी मुंबई मेट्रो रेल्वे धावणार आहे. मागील १० वर्षांपासून या रेल्वेचे काम सूरु होते. ३०६३ कोटी रुपये या प्रकल्पासाठी खर्च केले जाणार होते. त्यापैकी २९५४ कोटी रुपयांत या मेट्रोसाठी खर्च केला गेला आहे. ९८ हजार प्रवाशांना या मेट्रोसेवेचा लाभ होणार आहे. नवी मुंबई मेट्रो असे नाव या प्रकल्पाचे असले तरी प्रत्यक्षात बेलापूर, खारघर आणि तळोजा वसाहत या दरम्यानच्या प्रवाशांना या सेवेचा सर्वाधिक लाभ होणार आहे. १० ते ४० रुपयांमध्ये प्रवाशांना गारेगार प्रवास करता येणार आहे. खारघरवासियांचे मागील ५ वर्षांपासूनचे स्वप्न या सेवेमुळे पूर्ण होणार आहे.
पंतप्रधान मोदी हे खारघर येथील सेक्टर २८ ते ३१ येथील आंतरराष्ट्रीय कार्पोरेट मैदानावर महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमासाठी येणार असल्याने नवी मुंबई पोलीस, रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, सिडको महामंडळ, पनवेल महापालिका आणि नवी मुंबई महापालिका प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी खारघर वसाहतीच्या परिसरातील स्वच्छता व सुशोभीकरणाकडे विशेष लक्ष केंद्रीत केले होते. महामार्गावरील झाडे झुडपे सुद्धा कापण्याचे काम सुरु केले होते. मात्र खारघर येथील कार्पोरेट पार्क हे ठिकाण नामंजूर करण्यात आल्याचे समजते. १६ एप्रिलला खारघर येथील कार्पोरेट पार्कच्या मैदानावर महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२२ हा सोहळा आयोजित केला होता. यामध्ये दासभक्तांचा मृत्यू झाला होता. सोहळ्यात मान्यवरांसाठी शामियाना आणि दासभक्तांसाठी उन्हाचे थेट चटके असे नियोजन केल्यामुळे पाण्याने व्याकुळलेल्या राज्यभरातील दासभक्तांमध्ये चेंगराचेंगरी झाली. खारघरच्या दुर्घटनेची पुनरार्वृत्ती टाळण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे कोंबडभुजे गावाजवळील मोकळी जागा निवडण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून एक लाख महिला या कार्यक्रमासाठी येणार आहेत.