मुंबई (Mumbai) : नवी मुंबई महापालिकेने अनेक वर्षांपासून रखडलेल्या घणसोली-ऐरोली उड्डाणपुलाच्या बांधकामाचे टेंडर काढले आहे. महापालिका आणि सिडकोच्या आर्थिक भागीदारीतून या कामावर ८०० कोटी खर्च केले जाणार आहेत.
ऐरोली आणि घणसोलीला जोडण्यासाठी जोड रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्याचे काम गेल्या काही वर्षापासून प्रलंबित आहे. पर्यावरण विभागाच्या परवानगी अभावी हा मार्ग रखडला होता. मात्र, पर्यावरण विभागाच्या कचाट्यातून सुटल्यावर या प्रकल्पाच्या खर्चाचा मुद्दा समोर आला. या रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्याचा खर्चाचा भार जास्त असल्याने सिडको आणि महापालिका दोघांनी त्याचा खर्च उचलावा, अशी विनंती सिडकोला करण्यात आली होती. मात्र, त्यावर पुढे काहीच निर्णय झाला नसल्याने हा विषय प्रलंबितच राहिला होता. अखेर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार सिडको आणि महापालिका दोघांनी याचा आर्थिक भर उचलण्याला मान्यता दिल्याने या पुलाच्या उभारणीच्या कामाला वेग आला आहे.
सिडकोने नवी मुंबई शहर वसवताना बेलापूर ते ऐरोली असा २१.१५ किलोमीटर लांबीचा पामबीच रस्ता नियोजित केलेला होता. परंतु, १९.२० किलोमीटर लांबीचा बेलापूर ते वाशी हा रस्ता सिडकोने २००९ पर्यंत घणसोलीपर्यंत पूर्ण केला. मात्र, कांदळवन असल्याने प्राधिकरणाकडे मंजुरी मिळत नसल्याने १.९४ किलोमीटर लांबीचा रस्ता उड्डाणपुलाअभावी रखडला होता. या प्रकल्पासाठी ८०० कोटी खर्च अपेक्षित असल्याने महापालिकेने हा प्रकल्प रद्द केला होता. मात्र, सिडकोने खर्च उचलण्याची तयारी दर्शवल्याने पुलाचे काम होणार आहे. उड्डाणपुलामुळे घणसोलीवरून ऐरोलीला जाण्यासाठी वाहतूकदारांना वेगळा पर्याय उपलब्ध होणार आहे. तसाच ऐरोलीवरून विशेषतः मुलूंडमार्गे येणाऱ्या वाहनांना ठाणे-बेलापूर रस्त्यावर जाण्याची गरज भासणार नाही. त्यांना ऐरोली मुलूंड मार्गावरून या प्रस्तावित उड्डाणपुलामार्गे घणसोली गाठता येणार आहे. त्यामुळे वेळ तसेच इंधनाची बचत होणार आहे.