

मुंबई (Mumbai): श्री सिद्धिविनायक मंदिरात देश विदेशातून भाविक येत असतात. भाविकांना सुलभ व कमी वेळामध्ये सिद्धिविनायकाचे दर्शन झाले पाहिजे. मंदिर परिसरात पायाभूत सुविधांची कामे करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून मंदिर परिसराचा सुशोभीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराला नवे रूप मिळणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या सुशोभीकरण पहिल्या टप्प्यातील कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) सदानंद शंकर सरवणकर, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रसाद लाड, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी तसेच सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्यासह न्यासाचे विश्वस्त उपस्थित होते.
सुशोभीकरण प्रकल्पामुळे दररोज दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अधिक चांगल्या सुविधा आणि प्रसन्न वातावरण मिळणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचा व पुनर्नियोजनाचा प्रकल्प मुंबई महापालिकेने हाती घेतला आहे. महानगरपालिकेने सिद्धीविनायक मंदिरासाठी 500 कोटींची तरतूद केली आहे. सिद्धीविनायक मंदिर परिसराचा उज्जैनच्या महाकाल मंदिराप्रमाणे विकास करण्यात येणार आहे.
प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असून भाविकांना अधिक सुविधा देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून विशेष प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. सिद्धीविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्यामुळे मंदिरावर हल्ल्याच्या धमक्या सतत येत असतात. अनेकदा मंदिराला धोका असल्याची चर्चा होत असते.
त्यामुळे काही वर्षांपूर्वी मंदिराभोवती संरक्षक भिंत बांधण्यात आली. मात्र दिवसेंदिवस मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असल्यामुळे सध्या असलेल्या सुविधांमध्ये वाढ करण्याची गरज आहे. त्यात सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच मंदिर परिसराचाही कायापालट करण्याचा प्रकल्प महापालिका प्रशासनाने हाती घेतला असल्याचे सांगितले आहे.