मुंबई (Mumbai) : मुंबईत आता रस्ता तयार करण्यासाठी वेळ आणि पैशांची बचत करणारे 'प्रिकास्ट प्रिस्ट्रेस काँक्रीट पॅनेल' तंत्रज्ञान वापरून सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्यात येणार आहेत. नव्या तंत्रज्ञानामुळे वेळ आणि खर्चात बचत होणार आहे, प्रदूषणही कमी होणार आहे. शिवाय रस्तेही वेगाने तयार होणार आहेत. याअंतर्गत सिमेंट काँक्रीट तयार करून रस्ते न बनवता कास्टिंग यार्डमधून तयार पॅनेल आणून ते रस्त्यावर बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यासाठी आवश्यक सुमारे एक महिन्याचा कालावधी अवघ्या चार ते पाच दिवसांवर येणार आहे.
मुंबई महापालिकेने शहरातील सर्व रस्ते एकाच वेळी सिमेंट काँक्रीटचे करण्याचा घाट घातल्यामुळे आणि ठेकेदार प्रतिसाद देत नसल्याने गेल्या सव्वा वर्षांत तिसऱ्यांदा टेंडर मागवण्याची वेळ आली आहे. यातच पावसाळा तोंडावर आल्यामुळे रस्त्यांची ही कामे आता ऑक्टोबरनंतरच होण्याची शक्यता आहे. मुंबईतील रस्ते सिमेंट क्राँक्रीटचे करण्यासाठी सहा हजार कोटींचे टेंडर देण्यात आले आहे, मात्र मुंबईत 397 किमी अंतरातील 910 रस्त्यांच्या कामांपैकी आतापर्यंत 123 कामे सुरू झाली असून उर्वरित 787 कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. यातील फक्त 11 कामे पूर्ण झाली असून 4 प्रगतीपथावर आहेत.
प्रिकास्ट प्रिस्ट्रेस काँक्रीट पॅनेल तंत्रज्ञानात रस्त्याचा पृष्ठभाग भरणी आणि खडी, रोड रोलरच्या सहाय्याने समतल करण्यात येईल. रस्त्यावर येणारे पाणी स्ट्रॉम वॉटर ड्रेनमध्ये जाण्यासाठी उताराची व्यवस्था करण्यात येईल. यानंतर कास्टिंग यार्डमध्ये तयार केलेली मजबूत पॅनेल रस्त्यावर बसवण्यात येतील. यांची जाडी सुमारे चार ते सहा इंचांपर्यंत असेल. हे पॅनेल प्रिस्ट्रेट हायड्रोलिक वायरने मजबूतरीत्या जोडण्यात येतील. मुंबईत तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांसाठीचे सिमेंट काँक्रीट नवी मुंबई किंवा ठाण्यावरून आणले जाते. रस्त्यावर काँक्रीट ओतल्यानंतर 14 दिवस पाणी मारणे, चिरा जोडणे, काँक्रीट सुकवणे, अतिरिक्त लागलेले काँक्रीट हटवण्यासाठी खूप वेळ वाया जातो. शिवाय रस्त्यावर काँक्रीट तयार केल्यास हवा आणि ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतो. अनेक दिवस चालणाऱ्या कामामुळे स्थानिक रहिवासी तक्रारीही करतात, मात्र नव्या तंत्रज्ञानामुळे वेळ, खर्च कमी होऊन, प्रदूषणही टाळता येणार आहे. शिवाय रस्तेही वेगाने तयार होणार आहेत.