
मुंबई (Mumbai) : एप्रिल महिन्यात रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) मागवलेले टेंडर (Tender) अंदाजित खर्चाच्या 30 टक्क्यांपेक्षा कमी दराने आल्याने रिटेंडर मागविण्यात आले होते. आता पुन्हा त्याच कंत्राटदारांनी खर्च वाढवून कामे मिळवली आहेत. त्यामुळे महापालिकेला उलट 250 ते 280 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे, असा आरोप होत आहे.
महापालिकेने एप्रिल महिन्यात रस्ते दुरुस्तीसाठी टेंडर मागविले होते. त्यात पालिकेच्या अंदाजित दरापेक्षा 30 टक्क्यांहून अधिक कमी दराने कंत्राटदाराने टेंडर भरले. त्यावर आरोप होऊ लागल्यावर पालिकेने हे टेंडर रद्द केले. तसेच, टेंडर अटीत बदल करून पुन्हा टेंडर मागविण्यात आले. मात्र, यात तेच कंत्राटदार सहभागी झाले आहेत. तसेच, त्यांनी खर्च वाढवून दाखवला आता नियमानुसार त्याच कंत्राटदारांना काम मिळणार आहे. पूर्वी ज्यांनी 21 टक्के कमी दराने टेंडर भरले होते त्यांनी यावेळी 17 टक्के कमी दराने टेंडर भरले आहेत, असा आरोप समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केला. यातून महापालिकेचे साधारण 250 ते 280 कोटी रुपये त्याच कंत्राटदारांना पालिका जादा देणार आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर वाटाघाटी करुन हे दर कमी करुन घ्यावेत अशी मागणीही त्यांनी केली.
उण्या दराने येणाऱ्या टेंडरबाबत प्रशासनाकडून दरवेळीच वेगवेगळी भूमिका घेतली जाते. त्यांच्यावर कोणाचा राजकीय दबाव आहे. अशा प्रकारे कामे झाल्यास रस्त्यांच्या कामाचा दर्जा कसा राखला जाईल असा प्रश्न भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला.
परीक्षेच्या आदल्या रात्रीच चांगला अभ्यास
भाजपने 1800 कोटी रुपयांच्या 40 प्रस्तावात पुरेशी माहिती नसल्याने ती माहिती पुढील आठवड्यात सादर करण्याची मागणी. तोपर्यंत हे प्रस्ताव राखून ठेवावे अशी मागणी केली. त्यावर, निवडणुकीच्या तोंडावर रस्त्याची कामे अडवण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. त्यावर भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी आक्षेप घेतला. हे प्रस्ताव फक्त आठवडाभरासाठी राखून ठेवण्याची भूमिका आहे. फक्त निवडणुकीच्या तोंडावर नाही तर निवडणूक नसतानाही विकास कामे झाली पाहिजेत असा टोला शिरसाट यांनी लगावला. तर, पाच वर्षे कितीही अभ्यास केला तरी आदल्या रात्री जास्त चांगला अभ्यास होतो असे सांगत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या कामांचे समर्थन केले.
टेंडरनामाच्या फेसबुक पेजला लाईक करा - https://www.facebook.com/tendernama
टेंडरनामाच्या ट्विटर पेजला फॉलो करा - https://twitter.com/tendernama
टेंडरनामाच्या इन्टाग्राम पेजला फॉलो करा - https://www.instagram.com/tendernama