
मुंबई (Mumbai) : मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना गेट वे ऑफ इंडिया (Gate Way Of India) या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन परिसरात कुठूनही व्हावे या उद्देशाने मुंबई महानगरपालिका लवकरच याठिकाणचे अडथळे दूर करणार आहे. त्यामुळे गेट ऑफ इंडिया समोरील रस्त्यावरूनही संपूर्ण वास्तूला पाहणे सहजशक्य होणार आहे. येत्या काळात नव्या बदलांसह हा परिसर पर्यटकांना पहायला मिळणार आहे. या सुशोभीकरणाच्या कामासाठी मुंबई महानगरपालिका १४ कोटी रूपये खर्च करणार आहे. महापालिकेने या कामाचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.
सुशोभिकरणाच्या कामामुळे या परिसरातील तिकिट काऊंटर, टॉयलेट ब्लॉक, सुरक्षा चौकी हटवण्यात येणार आहेत. गेट वे ऑफ इंडिया वास्तू या परिसरात दिसण्यासाठीचे हे काही अडथळे आहेत. या गोष्टी हटवून त्याठिकाणी सरसकट कुठूनही वास्तू दिसेल अशा स्वरूपाची रचना याठिकाणी केली जाईल. वास्तूच्या परिसरात अनेक दिशांमधून या वास्तूला पर्यटकांना पाहता यावे हाच उद्देश या कामाच्या निमित्ताने ठेवण्यात आला आहे. या कामासाठी हेरीटेज समितीमार्फतचे ना हरकत प्रमाणपत्र मुंबई महानगरपालिकेने मिळवले आहे. त्यामुळे टेंडर प्रक्रियेचा भाग असलेल्या कामांना आता सुरूवात होणार आहे.
गेट वे ऑफ इंडिया या वास्तूच्या परिसरात अनेक ठिकाणी वीजेचे खांब आहेत. प्रकाश योजनेसाठी हे पथदिवे लावण्यात आले आहेत. परंतु या पथदिव्यांची संख्या कमी करत आता किमान वीजेचे खांब या परिसरात ठेवण्यात येतील. या नव्या खांबांवरुन सीसीटीव्ही आणि प्रकाश योजना अशा दोन्ही पद्धतीची सुविधा देण्यात येईल. त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांचा परिसरातील पुतळा हादेखील सर्व बाजूने पाहता येईल, अशा स्वरूपाचे काम येत्या काळात करण्यात येणार आहे.
सुशोभीकरणाचे काम हे मुंबई महापालिकेकडून करण्यात येणार आहे. त्यामध्ये सुरक्षा चौक्यांचा विकास करणे अपेक्षित आहे. सध्याची सुरक्षा चौकी हटवत नव्या ठिकाणी ही चौकी बसवण्यात येईल. महत्वाचे म्हणजे गेट वे ऑफ इंडियाच्या प्रवेशद्वाराच्या नक्षीकामाची मिळती जुळती डिझाईन या चौकीच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यासाठी वास्तूविशारद आभा लांबा यांनी हे काम हाती घेतले आहे. या वास्तूला शोभेल अशा स्वरूपाचे नवे बांधकाम या परिसरात करण्यात येणार आहे. शिवाय वास्तूची डागडुजी आणि देखभालीचे काम हे पुरातत्व विभागाकडून करण्यात येईल. सुमारे १०० मीटर परिसरातील देखभाल आणि दुरूस्तीची जबाबदारी ही पुरातत्व विभागाची असणार आहे.
मुंबई हेरीटेज संवर्धन समितीच्या शिफारशींनुसार या परिसरात कोणतीही वृक्षतोड करू नये, असे सूचवण्यात आले आहे. त्यामुळे वास्तू दिसण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये हा देखील महत्वाचा घटक असणार आहे. स्टॉल्स किंवा टॉयलेट ब्लॉक हे मात्र जमीनदोस्त करत त्यासाठी पर्यायी जागांचा विचार महापालिकेने केला आहे. त्यामुळे सध्या अडथळा ठरणारे तिकिट काऊंटरचे स्टॉल नव्या कामानुसार याठिकाणी दिसणार नाहीत. मुंबई महानगरपालिकेच्या 'अ' विभागाने या स्टॉल्स चालकांना नजीकच्या परिसरातच पर्यायी जागा देण्याचे कबूल केले आहे. त्यामुळे स्टॉल्सधारकांच्या रोषालाही महापालिकेला सामोरे जावे लागले आहे. मुंबईत सार्वजनिक सुट्ट्यांना, विकेंडला तसेच दिवाळी अन् उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत गेट वे ऑफ इंडिया परिसराला हजारोंच्या संख्येने पर्यटक भेटीला येत असतात.