
मुंबई (Mumbai) : मुंबई कचरामुक्त करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना कचरा पेट्या उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका १८ कोटी रुपये खर्च करणार आहे. 'विम प्लास्ट' ही कंपनी तब्बल १ लाख २० हजार कचरा पेट्यांचा पुरवठा करणार आहे.
मुंबई महापालिकेवर ८ मार्च २०२२ प्रशासकीय राजवट लागू झालेली आहे. तेव्हापासून अनेक गृहनिर्माण सोसायटी आणि वस्त्यांमध्ये कचरा पेट्यांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेक वस्त्यांमध्ये आजही कचरा पेट्या उपलब्ध नसल्याने गृहनिर्माण संस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. अखेर या कचरा पेटी देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. 'विम प्लास्ट' ही कंपनी या कचरा पेट्यांचा पुरवठा करणार आहे. त्यामुळे लवकरच प्रत्येक गृहनिर्माण संस्थांच्या मागणीनुसार या पेट्यांचे वाटप केले जाणार आहे.
तब्बल १ लाख २० हजार कचरा पेटींच्या पुरवठ्यासाठी टेंडर काढण्यात आले होते. टेंडर प्रक्रियेत 'विम प्लास्ट' या कंपनीने १,५८४ रुपये इतका कमी दर दिला होता, 'निलकमल'ने १,५९३ रुपये आणि 'एरिस्ट्रॉप्लास्ट प्रॉडक्ट्स लिमिटेड' कंपनीने १,५९८ एवढ्या दराची बोली लावली होती. अखेर १,५८४ इतका कमी दर आकारल्याने 'विम प्लास्ट' कंपनीला कचरा पेट्या पुरवठ्याचे टेंडर देण्यात आले आहे.