खरं काय? रेसकोर्सच्या 'त्या' जागेवर कुठलेही बांधकाम होणार नाही; आयुक्तांचा दावा
मुंबई (Mumbai) : महालक्ष्मी येथील रेस कोर्सच्या ९७ एकर जमिनीवर उद्यानच होणार असून कुठलेही बांधकाम होऊ देणार नाही. रेस कोर्स मुंबईकरांसाठी असून रेस कोर्ससाठी मुंबईकरांनी पुढे यावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ इकबाल सिंग चहल यांनी केले आहे. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रेस कोर्सची जागा राॅयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला १९१४ साली भाडे करारावर देण्यात आली. हा भाडे करार २०१३ मध्ये संपुष्टात आला. मात्र त्यानंतर करार वाढवण्यात आलेला नाही. एकूण २२६ एकर जमीन असून त्यापैकी १२० एकर जमिनीवर रेस कोर्स तर ९७ एकर जमिनीवर मुंबईसाठी उद्यान असणार आहे. याबाबत १८ डिसेंबर रोजी रेस कोर्सवर पार पाडलेल्या बैठकीत स्पष्ट केले होते. मात्र विकासकाच्या घशात रेस कोर्सची जागा जाणार असल्याचा आरोप केला जात आहे. हा आरोप बिनबुडाचा असून रेस कोर्सची ९७ एकर जमीन मुंबईसाठी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
रेस कोर्स बाबत मतदान प्रक्रिया राबवण्यात आली असून त्यापैकी ७७ टक्के मतदान रेस कोर्सच्या जमिनीवर उद्यान व्हावे या बाजूने केले आहे. त्यामुळे आता मुंबईकरांनी रेस कोर्ससाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, रेस कोर्सच्या ९७ एकर जमिनीवर उद्यान करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल. राज्य सरकार याबाबत पुढील निर्णय घेणार आहे. मात्र रेस कोर्सच्या जमीनीवर उद्यान होणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.