

मुंबई (Mumbai): मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या 'गोरेगाव-मुलुंड लिंक रोड' प्रकल्पाने आता पुढचा टप्पा गाठला आहे.
या प्रकल्पांतर्गत नाहूर ते ऐरोली दरम्यान १.३३ किमी लांबीच्या उड्डाणपुलासाठी १२९३ कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे. या नवीन पुलामुळे ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानची कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान आणि विनाअडथळा होणार आहे.
गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या चौथ्या टप्प्यात नाहूर ते ऐरोली या उड्डाणपुलाचे काम हाती घेतले जाणार आहे. हा पूल विद्यमान ऐरोली उड्डाणपुलावर बांधण्यात येणार असून, यात 'केबल स्टेड' पुलाचाही समावेश असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मार्गावर चार दिशांना जोडणारे इंटरचेंज असतील, जे पूर्णपणे सिग्नलमुक्त असणार आहेत.
या उड्डाणपुलाचे काम दोन मुख्य भागांत विभागले गेले आहे. पहिला टप्पा नाहूर ते ऐरोली दरम्यान १.३३ किमी लांबीचा मुख्य उड्डाणपूल आणि दुसरा टप्पा चार महत्त्वाचे इंटरचेंज (ठाणे-नाहूर, ऐरोली-ठाणे, मुंबई-ऐरोली आणि ऐरोली-मुंबई) असा आहे.
सध्या गोरेगाव ते मुलुंड प्रवासासाठी साधारण ७५ मिनिटे लागतात. मात्र, १२.२ किमी लांबीचा हा संपूर्ण लिंक रोड पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या २५ मिनिटांत पूर्ण होईल. म्हणजेच मुंबईकरांचा तब्बल ५० मिनिटे वाचणार आहेत.
या प्रकल्पामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहनांचा ताण लक्षणीयरीत्या कमी होईल आणि मुंबईकरांना ट्रॅफिक जॅममधून मोठा दिलासा मिळेल.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये...
एकूण खर्च : संपूर्ण प्रकल्प सुमारे १४,००० कोटी रुपयांचा आहे.
कनेक्टिव्हिटी : वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे थेट जोडले जातील.
फायदा : दक्षिण मुंबई, ठाणे, ऐरोली आणि नाहूर या चारही दिशांना जाणे सुलभ होईल.
दिंडोशी उड्डाणपूल : प्रकल्पाचा भाग म्हणून दिंडोशीजवळ १.२ किमीचा पूल बांधला जात असून, त्याचे काम २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.