

मुंबई (Mumbai) : मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमाने महत्त्वाकांक्षी पुनर्विकास आराखडा सादर केला. त्यानुसार बेस्टच्या मालकीच्या बस डेपो आणि इतर मालमत्तांच्या विकासाच्या अनुषंगाने मुंबईतील १३२ एकर क्षेत्रावर पसरलेल्या एकूण २२ बस आगारांचा सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह पुनर्विकास करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन बेस्ट उपक्रमाच्या विविध बस आगारांच्या आधुनिकीकरणाच्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सादरीकरणादरम्यान बेस्ट प्रशासनाने संस्थेची आर्थिक स्थिती, परिवहन व्यवस्थेतील सध्याची आव्हाने, वाढत्या प्रवासी संख्येनुसार बसांची आवश्यकता, तसेच डेपो, पार्किंग आणि ई-बस चार्जिंग सुविधांच्या कमतरतेबाबत सविस्तर माहिती दिली. मुंबईच्या वाढत्या वाहतूक गरजा लक्षात घेता भविष्यात सुमारे ७,००० बसेसचा ताफा उभारण्याची आवश्यकता असल्याचेही नमूद करण्यात आले.
या प्रकल्पासाठी सिंगापूर, पॅरिस, हाँगकाँग आणि लंडन येथील अत्याधुनिक बस डेपो आणि ट्रान्झिट हबच्या संकल्पनांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर मुंबईतील बस आगारांचे बहुउद्देशीय केंद्रांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी 'डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट अँड ट्रान्सफर' मॉडेलवर खासगी भागीदारांच्या सहकार्याने केली जाणार आहे.
पुनर्विकासानंतर डेपो परिसरात अत्याधुनिक ईव्ही चार्जिंग स्टेशन, बस पार्किंग सुविधा, चालक-वाहक व कर्मचाऱ्यांसाठी निवासी संकुले, प्रशासकीय कार्यालये आणि आधुनिक प्रवासी सुविधा उभारल्या जातील. तसेच उपलब्ध जमिनीचा अधिकतम वापर करून कमर्शियल कॉम्प्लेक्स, रिटेल मॉल्स, अर्बन प्लाझा, आर्ट गॅलरी, मल्टिलेव्हल कार पार्किंग आणि सार्वजनिक उपयोगाच्या विविध सुविधा विकसित करण्याची योजना आहे.
या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे बेस्टच्या महसुलात मोठी वाढ होण्याची अपेक्षा असून, मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे. यासोबतच बस डेपो हे केवळ वाहनतळ न राहता शहराच्या विकासाला चालना देणारे आधुनिक नागरी केंद्र म्हणून विकसित होणार असल्याचे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले.
मुंबईच्या वेशीवरील जकात नाके विकसित करा
मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहरात बाहेरून येणाऱ्या बसेसला ऑक्ट्रोय नाक्यांवर पार्किंगची व्यवस्था निर्माण करून दिली पाहिजे. या ठिकाणी प्रवाशांसाठी सुविधांची उभारणी करावी. त्याकरिता मुंबईच्या वेशीवरील दहिसर, मानखुर्द, मुलुंड येथील आनंद नगर, एलबीएस रस्ता, एरोली नका येथील जकात नाके विकसित करावेत.
या ठिकाणी बसेस पार्किंग आणि प्रवासी चढ - उतार सुविधा निर्माण केल्यास मुंबईत शहरात खासगी बसेस आणण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीवर मात करणे शक्य होईल. हे नाके ट्रान्सपोर्ट हबच्या स्वरूपात विकसित करावे. एसटी महामंडळ बसेसबाबत स्वतंत्ररित्या चर्चा करून समन्वयाने निर्णय घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.