मुंबई (Mumbai) : मुंबईला नवी मुंबईशी जोडणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी - न्हावा शेवा ट्रान्सहार्बर लिंक अर्थात अटल सेतूचे (Atal Setu) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आज (ता. १२) लोकार्पण करण्यात आले. या पुलाची पायाभरणीदेखील पंतप्रधान मोदींच्याच हस्ते डिसेंबर 2016 मध्ये झाली होती.
लोकार्पणानंतर पंतप्रधान मोदी यांनी या सागरी सेतूवरून प्रवास सुद्धा केला. त्यानंतर नवी मुंबई (Navi Mumbai) येथे पंतप्रधान मोदी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमात त्यांनी विविध विकासकामांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते.
नागरिकांसाठी शहरी पायाभूत सुविधा आणि वाहतूक सुविधा अधिक बळकट करून 'सुलभ गतिशीलते'ला चालना देणे, हे राज्य सरकारचे ध्येय आहे. या अनुषंगाने मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) बांधण्यात आला असून त्याचे नाव 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू करण्यात आले आहे.
अटल सेतू, एकूण 17,840 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करून बांधण्यात आला आहे. सुमारे 21.8 किमी लांबीचा 6 पदरी हा पूल असून समुद्रावर तो सुमारे 16.5 किमी लांबीचा तर जमिनीवर सुमारे 5.5 किमी लांबीचा आहे. हा भारतातील सर्वात लांब पूल आहे, तसेच देशातील सर्वात लांब सागरी पूलदेखील आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला यामुळे वेगवान कनेक्टिव्हिटी प्राप्त होणार असून मुंबईहून पुणे, गोवा आणि दक्षिण भारतासाठी प्रवासाच्या वेळेतदेखील बचत होणार आहे. यामुळे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर दरम्यानच्या वाहतूक व्यवस्थेत ही सुधारणा होणार आहे.
नवी मुंबई येथे झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सुमारे 12,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी झाली.
पूर्व मुक्त मार्गाचे ( ईस्टर्न फ्री वे )ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्हला जोडणाऱ्या भूमिगत रस्ता बोगद्याची पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी पायाभरणी करण्यात आली. हा 9.2 किमी लांबीचा बोगदा 8700 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करून बांधला जाईल. हा बोगदा मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल. यामुळे ऑरेंज गेट आणि मरीन ड्राइव्ह दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत बचत होईल.
सूर्या या मोठ्या प्रादेशिक पेयजल प्रकल्पाचा पहिला टप्पा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते समर्पित करण्यात आला. 1975 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च करून विकसित करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील पालघर आणि ठाणे जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असून सुमारे 14 लाख लोकसंख्येला यामुळे पिण्याच्या पाण्याचा लाभ होणार आहे.
याच कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदींनी सुमारे 2000 कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प समर्पित केले. यामध्ये ‘उरण-खारकोपर रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचा’ समावेश आहे, ज्यामुळे नवी मुंबईशी स्थानिक संपर्क अधिक वाढणार आहे; कारण नेरुळ/बेलापूर ते खारकोपर दरम्यान असलेल्या उपनगरीय रेल्वेसेवा आता उरणपर्यंत वाढवण्यात आली आहे. उरण रेल्वे स्थानक ते खारकोपर या ईएमयू रेल्वेगाडीला हिरवी झेंडी दाखवून त्याचेही उदघाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले.
याशिवाय इतर रेल्वे प्रकल्पात त्यामध्ये ठाणे-वाशी/पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील नवीन उपनगरीय स्थानक 'दिघा गाव' तसेच खार रोड आणि गोरेगाव रेल्वे स्थानकादरम्यान नवीन सहाव्या रेल्वेमार्गाचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे मुंबईतील हजारो प्रवाशांचा दैनंदिन रेल्वेप्रवास सुलभ होणार आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विशेष आर्थिक क्षेत्र - मेटल सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक निर्यात प्रक्रिया विभाग -(SEEPZ SEZ) येथे असलेल्या, 3D प्रिंटिंग मशिनसह जगातील सर्वोत्तम उपलब्ध मशिन्ससह भारतात सुरू झालेल्या पहिल्या रत्ने आणि आभूषणे क्षेत्राच्या 'भारतरत्न' या विशाल व सर्वसाधारण सुविधा केंद्राचे (मेगा कॉमन फॅसिलिटेशन सेंटर) उदघाटन करण्यात आले.
यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसह या क्षेत्रातील कामगारांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी विशेष केंद्र सुरू करण्यात येणार आहे. हे विशाल केंद्र (CFC) रत्न आणि दागिन्यांच्या व्यापारात निर्यात क्षेत्राचा कायापालट करेल आणि देशांतर्गत उत्पादनालाही मदत करेल.
सिप्झ विशेष आर्थिक क्षेत्र (SEEPZ- SEZ) येथील नवीन उपक्रम आणि सेवा केंद्र (NEST)- याचेही उदघाटन पंतप्रधान करण्यात आले आहे. NEST - 01 हे प्रामुख्याने रत्ने आणि आभूषणे क्षेत्रासाठी सुरू केलेले केंद्र आहे जे सध्या स्टँडर्ड डिझाइन फॅक्टरी-I येथे आहे. उद्योगाच्या मागणीनुसार तसेच मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी हे नवीन केंद्र तयार बांधण्यात आले आहे.
कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ केला. या अभियानाचा उद्देश राज्यातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन आणि उद्योजकता विकासासाठी सक्षम करणे हा आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या महिला विकास कार्यक्रमांचे एकत्रीकरण आणि परिपूर्णता यासाठी या अभियानाद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत.