
मुंबई (Mumbai) : ठाणे-बोरिवली भूमिगत मार्गाची टेंडर प्रक्रिया पूर्ण करून येत्या पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे नियोजन आहे. तूर्तास या मार्गाच्या बांधकामासाठी १६,६०० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. हा निधी उभारण्यासाठी एमएमआरडीएने नुकतेच आर्थिक सल्लागार नियुक्तीचे टेंडर काढले आहे.
ठाणे-बोरिवली दरम्यान ११.८ किमीच्या भूमिगत मार्गाची बांधणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी एमएमआरडीएने मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नियुक्ती केली आहे. सुधारित आराखड्यानुसार या मार्गिकेच्या ११.८ कि.मी. लांबीपैकी ४.४३ कि.मी. लांबी ही ठाणे जिल्ह्यातून व ७.४ कि.मी लांबी ही बोरीवली जिल्ह्यातून प्रस्तावित केली आहे. तर बोगद्याकडे जाण्यासाठी ठाण्याच्या दिशेने घोडबंदर येथे उड्डाण पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. प्रकल्पाचा अंदाजित बांधकाम खर्च रॉयल्टी वगळून भूसंपादनासह १६ हजार ६०० कोटी इतका आहे. या प्रकल्पाचे बांधकाम एकूण ३ पॅकेजसमध्ये करण्याचे प्रस्तावित आहे. त्यापैकी स्थापत्य कामाचे २ पॅकेजेस व तिसऱ्या भागात सुनियोजित वाहतूक प्रणाली या कामाचा समावेश आहे.
यामध्ये पॅकेज १ (बोरिवली बाजू) साठी येणारा खर्च ७२७३ कोटी, पॅकेज २ (ठाणे बाजू) साठी येणारा अंदाजित खर्च ७४६१ कोटी आणि पॅकेज ३ मध्ये सिस्टमची खरेदी, स्थापना आणि कार्यान्वित करण्यासाठी येणारा अंदाजित खर्च ५३० कोटी इतका आहे. सुधारित आराखड्यात बोगद्यातील अत्याधुनिक यंत्रणा, ओपन रोड टोलिंग यंत्रणा आणि भुयारी मार्गात प्रत्येकी ३०० मीटर अंतरावर पादचारी क्रॉसिंग पॅकेज उभारण्यात येणार आहे, यामुळे प्रकल्प खर्चात वाढ झाली आहे.
प्रकल्प उभारणीसाठी येणारा खर्च आणि त्यासाठी आवश्यक निधी उभारणीसाठी आर्थिक सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. कर्ज उभारणी झाल्यांनतर कर्जाची परतफेड आणि इतर आर्थिक बाबींच्या निश्चितीसाठी आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्यक आहे. सल्लागार नियुक्तीसाठी एमएमआरडीएने टेंडर प्रसिद्ध केले असून लवकरच आर्थिक सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली.