
मुंबई (Mumbai) : मिरा-भाईंदर क्षेत्रातील फाउंटन हॉटेल ते ठाण्यातील गायमुखदरम्यान प्रस्तावित असलेला उन्नत रस्ता तसेच उन्नत मेट्रो मार्ग यासाठी नागपूर मॉडेलप्रमाणे नियोजन करण्यात येणार आहे. भाईंदर-ठाणे हा सध्याचा रस्ता त्यावर उन्नत रस्ता आणि उन्नत मेट्रो मार्ग अशी नागपूर मॉडेलच्या धर्तीवर ही त्रिस्तरीय रचना असणार आहे. भाईंदर ते ठाणे या रस्त्यावरील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हे सर्व काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) करणार आहे. दरम्यान, टेंडर प्रक्रिया राबवून खासगी जागेवर तातडीने काम सुरू करावे, अशा सूचना मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिल्या आहेत.
सध्या भाईंदरहून ठाण्याला जाताना फाउंटन हॉटेल ते गायमुखदरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. याचा वाहनचालकांना नाहक त्रास करावा लागत आहे. याशिवाय, या मार्गावर अवजड वाहनांची प्रचंड वर्दळ आहे. हा रस्ता सध्या ३० मीटर रुंद असल्याने प्रवाशांना कायम वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. भविष्यात डहाणू येथे वाढवण बंदर येत आहे. त्यामुळे वाढवण ते ठाणे या मार्गावरील अवजड वाहनांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. फाउंटन ते गायमुख हा रस्ता तेवढाच राहिला, तर वाहतूक व्यवस्थाच कोलमडून जाण्याची शक्यता आहे. गेल्या ३० वर्षांत ठाणे आणि मिरा-भाईंदर शहरांच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे आगामी ३० वर्षांचा विचार करता या लोकसंख्येत आणखी मोठी वाढ अपेक्षित आहे. लोकसंख्या वाढीसोबतच वाहनांची संख्याही वाढत जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात दिल्ली व गुजरातला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ आणि नवी मुंबई, पुणे आणि मुंबई यांना जोडणारा घोडबंदर रस्ता हा महत्त्वाचा ठरणार आहे.
यासाठी सध्याच्या भाईंदर ते ठाणे रस्त्यावर उन्नत मार्ग बांधण्याचा प्रस्ताव आहे. दुसरीकडे मुंबईतून मिरा-भाईंदरला येणारी मेट्रो काशी मिरा नाक्यावरून ठाण्याच्या दिशेने जाणार आहे. त्यासाठी उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. हे सर्व काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) करणार आहे. या सर्व मार्गांचे नागपूर मॉडेलप्रमाणे नियोजन करण्याच्या सूचना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या. या विषयावरील एका बैठकीचे मंत्रालयात नुकतेच आयोजन केले होते. याप्रसंगी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक आणि संरक्षक अनिता पाटील, मिरा-भाईंदर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सचिन बांगर, कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, उपअभियंता यतीन जाधव, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक पुरुषोत्तम शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते.
फाउंटन हॉटेल ते गायमुख हा सध्याचा ३० मीटर रुंद रस्ता ६० मीटर रुंद करण्यात येणार आहे. या रस्त्याच्यावरून जाणारा उन्नत रस्ता चारपदरी असणार आहे. त्याला नागपूरप्रमाणे ज्या भागात नागरी वस्ती आहे, तेथे उतार (रॅम्प) देण्यात येईल. त्याचप्रमाणे या उन्नत मार्गाच्या मध्यभागातून मेट्रोचा उन्नत मार्ग जाईल, या पद्धतीने त्याची रचना असणार आहे. सध्या काशी मिरा नाक्यावर असलेला उड्डाणपूलही उन्नत मार्गाला जोडला जाणार आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली. फाउंटन ते गायमुख या रस्त्याच्या एकूण जागांपैकी १५ ते २० टक्के जागा ही वन विभागाची आहे. वन विभागाची परवानगी घेण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेने एक आठवड्याच्या आत प्रस्ताव पाठवावा. त्यानंतर वन विभाग मंजुरीबाबत कार्यवाही करेल. वन विभागाची मान्यता येईपर्यंत टेंडर प्रक्रिया राबवून खासगी जागेवर काम सुरू करावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. सध्याचा फाउंटन हॉटेल ते गायमुख रस्त्याचे ६० मीटरपर्यंत रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा, रस्त्याचे रुंदीकरण करताना लगतच्या खासगी जागांचे भूसंपादन करावे लागणार आहे, त्यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेने भू-संपादनाची प्रक्रिया करावी. या भूसंपादनात बाधित होणाऱ्या लोकांना टीडीआरच्या स्वरूपातील मोबदला मिरा-भाईंदर महापालिका देईल, तर आर्थिक स्वरूपाचा मोबदला एमएमआरडीए देईल, अशाही सूचना सरनाईक यांनी यावेळी दिल्या.