Chandrakant Patil
Chandrakant PatilTendernama

Chandrakant Patil : 'त्या' विद्यापीठाच्या इमारत बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात 250 कोटींचा प्रस्ताव

Published on

मुंबई (Mumbai) : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील मुंबई येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या प्रस्तावित इमारत बांधकामाचा प्रस्ताव २५० कोटी रूपये तरतुदीमध्ये बसवावा. तसेच इतर विद्यापीठ इमारती, विविध कार्यालये, वसतिगृहे, नवीन इमारत बांधकाम व इमारतींची दुरूस्तींची कामे कालमर्यादेत पूर्ण करावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले.

Chandrakant Patil
अजितदादांचा धडाका; 'या' राष्ट्रीय मार्गाचे गतीने काम न करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट करा

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडील विविध इमारती, कार्यालये, जुन्या इमारतींच्या दुरूस्ती बाबत आढावा बैठक मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय व भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संग्रहालय इमारत बांधकाम प्रस्तावाबाबत सूचना देताना मंत्री श्री. पाटील म्हणाले, या इमारतीला आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. इमारतीच्या संरचनेमध्ये काही बदल करावयाचे असल्यास आताच करून घ्यावे. या बदलानंतर अंदाजपत्रकीय तरतुदीवर परिणाम होणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्रशासकीय मान्यता, टेंडर प्रक्रिया गतीने राबविण्यात यावी. सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृह इमारतीचे बांधकाम सुरू करावे. पुढील दोन वर्षात मुलींना वसतिगृह उपलब्ध झाले पाहिजे. त्यानुसार नियोजन करावे.

Chandrakant Patil
Mumbai-Goa महामार्गासाठी शेवटची डेडलाईन; अन्यथा कठोर कारवाई

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई येथील प्रस्तावित बांधकामाबाबत निर्देश देताना मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, इमारत बांधकामाचा प्रस्ताव २५० कोटी रूपये तरतुदीमध्ये बसवावा. पुढे आणखी निधी लागल्यास त्या पद्धतीने कार्यवाही करावी. इमारतीचे काम फेजमध्ये पूर्ण करावे. वांद्रे येथील सर जे. जे. कला महाविद्यालय संस्थेचे वसतीगृह व वास्तुशास्त्र वसतीगृह इमारतीचे काम सुरू करावे. हेरीटेज इमारत असल्यामुळे काम दर्जेदार करावे. एसएनडीटी विद्यापीठाच्या जुहू येथील सभागृहाचे काम बदल न करता पूर्ण करावे. वेळेची मर्यादा पाळावी. राज्यात शासकीय तंत्र निकेतन येथील विविध दुरूस्ती, रंगरंगोटीची कामे पूर्ण करावी. शासकीय तंत्र निकेतनच्या इमारती सुंदर कराव्यात, असे निर्देशही मंत्री पाटील यांनी यावेळी दिले. बैठकीत बांधकामाधीन, बांधकाम सुरू होणाऱ्या इमारतींचा विस्तृत आढावा घेण्यात आला. बैठकीस प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्ज्वला चक्रदेव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता रणजित हांडे, जे. जे महाविद्यालयाचे संचालक राजेश मिश्रा, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव अशोक मांडे, प्रताप लुबाळ, सहसंचालक हरीभाऊ शिंदे, आदिनाथ मंगेशकर आदी उपस्थित होते. 

Tendernama
www.tendernama.com