
मुंबई (Mumbai) : डोंबिवली - काटई ते अंबरनाथ या मार्गातील खोणी ते फॉरेस्ट नाका येथील रस्त्याचे लवकरच काँक्रिटीकरण होणार आहे. या कामासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) ११६ काेटी ६४ लाख रुपयांचे टेंडर (Tender) प्रसिद्ध केले आहे. त्याचबरोबर डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील (Dombivli) विको नाका ते डीएनएस जंक्शन रस्त्याचेही काँक्रिटीकरण होणार असून, यासाठी ९ काेटी ८२ लाख रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.
काटई ते अंबरनाथ या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. काकोळे येथील वालधुनी नदीवरील पुलाचे बांधकामही करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत या मार्गावरून डोंबिवलीच्या दिशेने जाण्याचा आणि परतीचा मार्ग हा समांतर नसल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. या पुलाच्या उभारणी नंतर दोन्ही मार्गिका समांतर स्थितीत येणार असून यामुळे नागरिकांच्या प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
त्याचबराेबर डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील विको नाका ते डीएनएस जंक्शन आणि डोंबिवली औद्योगिक क्षेत्राबाहेरील रोटेक्स सेवा रस्त्याचेही काँक्रिटीकरण होणार आहे. या रस्त्यावरून सद्यस्थितीत प्रवास करताना नागरिकांना त्रास हाेतो. काटई खोणी रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी २०.४५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून हे कामही शेवटच्या टप्प्यात आहे.
एमआयडीसी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या टेंडरद्वारे खोणी ते फॉरेस्ट नाका हा ८ किलोमीटर रस्ता, डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील विको ते डीएनसी हा २ किलोमीटर रस्ता आणि औद्योगिक क्षेत्राबाहेरील रोटेक्स सेवा रस्त्याचे काम येत्या दोन वर्षात पूर्ण केले जाणार आहे. हे काम मार्गी लावण्यासाठी कल्याणचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला आहे.
या रस्ते कामांना मंजुरी दिल्याने त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत याचे आभार मानले आहेत.