Mumbai : म्हाडाचे 'त्या' 12 भूखंडांसाठी रिटेंडर
मुंबई (Mumbai) : मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी असलेल्या भूखंडाच्या विक्रीसाठी म्हाडाने मागवलेल्या टेंडरला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे १६ पैकी १२ भूखंडाच्या विक्रीसाठी रिटेंडर काढण्याची नामुष्की म्हाडावर ओढवली आहे. सुमारे ३७५ कोटींचा महसूल याद्वारे उभा करण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे.
मुंबई महापालिकेने म्हाडाच्या भूखंडावर शाळा, रुग्णालय, खेळाचे मैदान अशा वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण टाकले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी निवासी इमारती उभारणे शक्य नसल्याने ३७५ कोटींच्या १६ भूखंडाची विक्री करण्याचा निर्णय मार्चमध्ये घेण्यात आला होता. मात्र, दोन महिन्यात या टेंडर प्रक्रियेला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. १२ भूखंडांना कमी बोली लागल्याने ११ जूनपर्यंत इच्छुकांकडून टेंडर मागवली आहेत. त्यानुसार टेक्निकल टेंडर १२ जून रोजी उघडले जाणार आहे, त्यानंतर कमर्शियल टेंडरची तारीख म्हाडा लवकरच जाहीर करणार आहे. मालाड, मालवणी, चारकोप, विक्रोळी टागोरनगर, कन्नमवार नगर, प्रतीक्षा नगर, ओशिवरा येथील भूखंडाची कमाल किंमत म्हाडाने निश्चित केली आहे.