मेट्रो कारशेडसाठी जमीन दिलेल्या १९८ शेतकऱ्यांना विकसित भूखंडांचे वाटप

मोघरपाड्यातील सर्व्हे क्रमांक ३० मधील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना जमीन धारणाधिकार वर्ग १ अंतर्गत मालकी हक्काने भूखंड देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
Metro
MetroTendernama
Published on

मुंबई (Mumbai): मुंबई मेट्रो मार्गिका ४, ४अ आणि १०च्या एकात्मिक कारशेड डेपोसाठी जमीन दिलेल्या ठाणे जिल्ह्यातील मोघरपाडा येथील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना विकसित भूखंडांचे वाटप करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार सर्व्हे क्रमांक ३० मधील १९८ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना २२.५ टक्के आणि १२.५ टक्के विकसित भूखंड मालकी हक्काने देण्यात येणार आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मोघरपाडा (ता. जि. ठाणे) येथील या निर्णयामुळे मेट्रो कारशेडसाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना विकसित भूखंड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Metro
मुंबईसह एमएमआरमध्ये 2047 पर्यंत सरकार बांधणार 30 लाख परवडणारी घरे

मेट्रो प्रकल्पासाठी १७४.०१ हेक्टर जमीन

मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक आणि परिवहन व्यवस्था सुधारण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) मेट्रो रेल प्रकल्पाचा बृहत आराखडा तयार केला आहे. त्याअंतर्गत वडाळा ते कासारवडवली, ठाणे या मेट्रो मार्गिका-४ प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. या मार्गिकेला निकडीचा सार्वजनिक प्रकल्प आणि महत्त्वपूर्ण नागरी परिवहन प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे. पुढे ही मार्गिका गायमुखपर्यंत वाढविण्यात आली आहे.

मेट्रो मार्गिका ४, ४अ, १० आणि ११ यांच्यासाठी मोघरपाडा येथे एकात्मिक कारशेड डेपो उभारण्यात येत आहे. यासाठी सर्व्हे क्रमांक ३० मधील एकूण २११.७६ हेक्टर जमिनीपैकी १७४.०१ हेक्टर जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला मिळाली आहे.

२२.५ आणि १२.५ टक्के विकसित भूखंड

या जमिनीवरील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना २२.५ टक्के आणि १२.५ टक्के विकसित भूखंड वाटप करण्याच्या योजनेला तत्कालीन मुख्यमंत्री तथा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी मान्यता दिली होती.

या निर्णयानुसार सर्व्हे क्रमांक ३० मधील १६७ प्रकल्पबाधित शेतकरी आणि ३१ अतिक्रमणधारक शेतकरी अशा एकूण १९८ शेतकऱ्यांना विकसित भूखंडांचे वाटप केले जाणार आहे.

हे भूखंड जमीन धारणाधिकार वर्ग १ या स्वरूपात मालकी हक्काने देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

Metro
नवी मुंबई मेट्रोचा विस्तार फास्टट्रॅकवर; पेंधर-पनवेल-नैना केनेक्टिव्हिटीसाठी टेंडर प्रक्रिया सुरू

Key Points

  • मेट्रो मार्गिका ४, ४अ आणि १०च्या एकात्मिक कारशेडसाठी जमीन दिलेल्या १९८ शेतकऱ्यांना विकसित भूखंड

  • मोघरपाडा येथील सर्व्हे क्रमांक ३० मधील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना वाटप

  • १६७ प्रकल्पबाधित आणि ३१ अतिक्रमणधारक शेतकरी लाभार्थी

  • २२.५ टक्के आणि १२.५ टक्के विकसित भूखंड वाटप योजनेला मंजुरी

  • २११.७६ हेक्टरपैकी १७४.०१ हेक्टर जमीन एमएमआरडीएला मिळाली

  • विकसित भूखंड जमीन धारणाधिकार वर्ग १ अंतर्गत मालकी हक्काने देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

Tendernama
www.tendernama.com