४ लाख शेत-पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग; राज्यात उभारणार ‘महापाणंद ग्रिड’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘शेत सेतू : महापाणंद गतीशक्ती’ अभियानाचा प्रारंभ; १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम
Panand Raste Yojana
Panand Raste YojanaTendernama
Published on

मुंबई (Mumbai): राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीपर्यंत बारमाही, सुरक्षित आणि सुलभ संपर्क सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महसूल व भूमी अभिलेख विभागामार्फत ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना - शेत सेतू : महापाणंद गतीशक्ती’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या अभियानाची सुरवात करण्यात आली. या अभियानांतर्गत राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारण्यात येणार आहे.

Panand Raste Yojana
जेएनपीएहून डबल-स्टॅक कंटेनर मालगाडीला हिरवा झेंडा; ३२६ किमी फ्रेट कॉरिडॉरचे लोकार्पण

राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दीर्घकालीन संपर्क सुविधेची हमी देणे आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून थेट सेवा उपलब्ध करून देणे, ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आकारास आलेली ही योजना केवळ शासकीय उपक्रम न राहता जनआंदोलन बनावी, यासाठी सेवा सप्ताहात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी नव्याने सुरू करण्यात आलेल्या मोबाईल ॲपद्वारे सूचना व अभिप्राय नोंदवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत गावठाण, मुख्य रस्ते आणि शेतजमिनी यांना जोडणाऱ्या पाणंद रस्त्यांचे जाळे अधिक सक्षम करण्यात येणार आहे. शेतमाल, बियाणे, खते तसेच कृषी यंत्रसामग्री शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी दळणवळण व्यवस्था अधिक सुलभ आणि किफायतशीर करण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रस्तावापासून काम पूर्ण होईपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता, गतिमानता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्याचे नियोजन आहे.

Panand Raste Yojana
मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; ₹17,725 कोटींच्या Metro-13ला हिरवा कंदील

राज्यातील सुमारे चार लाख शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल नेटवर्क ‘इंटेलिजंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयडब्लूएमएस) मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. उपग्रह प्रतिमांच्या साहाय्याने या रस्त्यांचे भौगोलिक स्थान सार्वजनिक पोर्टलवर पाहता येणार आहे. या एकात्मिक डिजिटल प्रणालीद्वारे प्रकल्प निर्मिती, अंदाजपत्रक, तांत्रिक व प्रशासकीय मान्यता, कार्यादेश, ई-मेझरमेंट बुक आणि ई-बिलिंग यांसह कामाच्या विविध टप्प्यांचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे.

सेवा सप्ताहादरम्यान ग्रामसभांच्या माध्यमातून जनजागृती, प्राधान्य रस्त्यांची निवड, विनाशुल्क सीमांकन आणि अतिक्रमणमुक्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे. नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठीही विशेष उपक्रम राबविले जाणार आहेत. राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायतींमधून अंदाजे ५० हजार रस्ते आयडब्लूएमएस प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

यावेळी शेतकरी तक्रार व अभिप्राय मोबाईल ॲपचाही शुभारंभ करण्यात आला. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी फोटो, व्हिडिओ आणि जीपीएस स्थानासह थेट तक्रारी व अभिप्राय नोंदवू शकणार आहेत.

ग्रामीण भागात शाश्वत पायाभूत सुविधा निर्माण करून शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Panand Raste Yojana
मुंबई पुढील १० वर्षांत झोपडपट्टीमुक्त करणार; धारावी पुनर्विकासाला वेग देणार : मुख्यमंत्री फडणवीस

महत्त्वाचे मुद्दे...

  • राज्यात ‘महापाणंद ग्रिड’ उभारण्यात येणार.

  • सुमारे ४ लाख शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल नेटवर्क तयार.

  • १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष मोहीम.

  • सुमारे २८ हजार ग्रामपंचायतींमधून ५० हजार रस्ते आयडब्लूएमएसमध्ये समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट.

  • उपग्रह प्रतिमांच्या माध्यमातून रस्त्यांचे भौगोलिक स्थान सार्वजनिक पोर्टलवर उपलब्ध.

  • प्रकल्प निर्मितीपासून ई-बिलिंगपर्यंतची प्रक्रिया डिजिटल केली जाणार.

  • ग्रामसभांमधून प्राधान्य रस्त्यांची निवड आणि जनजागृती.

  • रस्त्यांचे विनाशुल्क सीमांकन व अतिक्रमणमुक्तीची कार्यवाही.

  • शेतकरी फोटो, व्हिडिओ व जीपीएस लोकेशनसह तक्रार आणि अभिप्राय ॲपवर नोंदवू शकणार.

Tendernama
www.tendernama.com