
मुंबई (Mumbai): मुंबई महापालिकेच्या (BMC) दीड किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित मढ-वर्सोवा पूलाचे काम साधारण येत्या ऑक्टोबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. वर्सोवा आणि मढ बेटाला जोडण्यासाठी समुद्रावर एक केबल पूल बांधला जाईल. यामुळे वर्सोवा ते मढ हा प्रवास फक्त ५ ते ७ मिनिटांत पूर्ण करता येईल. महापालिकेने अलीकडेच या पुलाच्या बांधकामासाठी टेंडर काढले आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरांमधील कनेक्टिव्हीटी सुधारण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने हा महत्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे. येथील नागरिकांना आतापर्यंत फेरी सेवेवर अवलंबून राहावे लागते किंवा २२ किमीचा लांब रस्ते मार्गे प्रवास करावा लागतो, ज्यामुळे वेळ आणि इंधन दोन्ही वाया जाते. अलिकडेच, महापालिकेने या पुलाच्या बांधकामासाठी टेंडर काढले आहे.
बांधकामाचे काम लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. या पुलावर चार पदरी रस्ता असेल. याशिवाय पादचाऱ्यांसाठी आणि सायकलस्वारांसाठी स्वतंत्र मार्ग देखील बनवले जातील. पुलावर सुरक्षा, विशेष प्रकाशयोजना आणि आपत्कालीन सुविधा यासारख्या बाबींवर देखील विशेष लक्ष दिले जाईल.
तथापि, हा पूल सागरी क्षेत्र आणि कोस्टल रेग्युलेशन झोन (सीआरझेड) मध्ये येत असल्याने या प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुऱ्यांची प्रतीक्षा होती. मात्र केंद्र सरकारने या प्रकल्पाला सर्व प्रमुख पर्यावरणीय मंजुऱ्या दिल्या असून आता केवळ काही न्यायालयीन मंजुऱ्यांची प्रतीक्षा आहे.
प्रकल्पाचे काम सुरू होण्यापूर्वी, सुमारे २.७५ हेक्टर खारफुटीच्या जंगलातील वनजमीन स्थलांतरित करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आवश्यक असेल. भरपाई म्हणून, महानगरपालिकेने वनीकरणासाठी तीन हेक्टर जमीन आधीच निश्चित केली आहे. प्रत्येक एका झाडामागे तीन रोपे लावण्याचे वचन दिले आहे. न्यायालयीन मंजुरीसाठी दोन ते तीन महिने लागतील असे म्हटले जाते, त्यानंतर भूमी अधिग्रहण सुरू होईल. हे पाहता ऑक्टोबरपर्यंत प्रकल्पाचे बांधकाम सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या १९६७च्या विकास आराखड्यात पहिल्यांदा कल्पना करण्यात आलेल्या या प्रकल्पाला खासदार पियुष गोयल आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात अलिकडेच झालेल्या बैठकीनंतर पुन्हा गती मिळाली आहे, त्यानंतर हा विषय औपचारिकपणे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयासमोर मांडण्यात आला.