
मुंबई (Mumbai) : मध्य रेल्वेच्या कार्यक्षमतेत आणि सुरक्षिततेत वाढ करण्यासाठी कर्जत यार्ड रिमॉडेलिंग (पुनर्रचना) प्रकल्प आणि नवीन रूट रिले इंटरलॉकिंग (RRI) प्रणाली नुकतीच यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आली. ७४.५३ कोटी खर्चून पूर्ण झालेल्या या प्रकल्पामुळे मध्य रेल्वेवर ट्रेन हाताळण्याची क्षमता तब्बल २५ टक्क्यांनी वाढणार असून, उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे.
कर्जत येथे १९८७ पासून कार्यरत असलेल्या सर्वात जुन्या आरआरआय प्रणालीला आता आधुनिक सीमेन्स प्रणालीने बदलले आहे. या अत्याधुनिक प्रणालीमुळे ऑपरेशन्स अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहेत.
कर्जत ते पळसधरी दरम्यानची नवीन चौथी लाईन खोपोली शाखेला पूर्णपणे वेगळे करेल, ज्यामुळे उपनगरीय गाड्यांची वाहतूक आता कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि जलद होईल. 'द्विदिशात्मक लाईन ७' मुळे पनवेलहून येणाऱ्या मालगाड्यांना आता थेट कर्जत यार्डमध्ये प्रवेश देणे शक्य झाले आहे, ज्यामुळे मालाची वाहतूक अधिक कार्यक्षम होईल.
वाढवलेल्या अप/डाऊन लाईन्समुळे पूर्ण लांबीचे रेक आणि कसारा घाट चढणाऱ्या बँकर कार्यांचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. यार्डमध्ये ३५० खांब आणि ९ टीडीएम नवीन ओव्हरहेड इक्विपमेंट वायरिंगचे काम करण्यात आले. यासोबतच, ४.९ किमी नवीन ट्रॅक टाकण्यात आला असून, ८ पूल आणि २ फूट ओव्हर ब्रिजचा विस्तार करण्यात आला आहे.
कर्जत आणि भिवपुरी दरम्यान स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली लागू केल्यामुळे उपनगरीय विभागात गाड्यांची जलद हालचाल शक्य झाली आहे. या प्रकल्पामुळे मार्ग, सिग्नल्स आणि ट्रॅक सर्किट्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामुळे कर्जत यार्ड मध्य रेल्वेच्या पश्चिम घाटाच्या पायथ्याशी एक अत्यंत कार्यक्षम जंक्शन म्हणून उभे राहील.
कर्जत यार्ड रीमॉडेलिंगमार्फत सेंट्रल रेल्वेला नवी गती आणि बळकटी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार!
- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री