भाजपचा प्रवास 'वॉशिंग मशीन' ते 'धोबी घाट'! का होतोय आरोप?

Land Scam: जमीन घोटाळ्यातील आरोपीच्या प्रवेशावरून काँग्रेसचे टीकास्त्र
BJP
BJP Tendernama
Published on

मुंबई (Mumbai): आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये इनकमिंग जोरात आहे. पण मंगळवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात जो प्रवेश सोहळा पार पडला, त्याने विरोधकांना भाजपवर टीका करण्याची आणखी एक संधी दिली आहे.

निमित्त होते रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा व माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर आणि त्यांचे पती दत्ता पाचुंदकर यांच्या पक्षप्रवेशाचे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हे दाम्पत्य भाजपजवळ आले आणि काँग्रेसला भाजपवर टीकेची धार वाढवण्याची आयती संधी मिळाली.

BJP
Pune Ring Road: रिंगरोडचा खर्च कमी होणार; 'त्या' 31 किमीच्या रस्त्यासाठी पुन्हा टेंडर

काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी या पक्षप्रवेशावर टीका करताना भाजपला थेट धोबी घाट म्हणून हिणवले. भाजप वॉशिंग मशीन आहे ही बाब जुनी झाली आहे, आता भाजप धोबी घाट झाला आहे, अशी टीका त्यांनी केली.

रांजणगावातील प्रसिद्ध महागणपती देवस्थानच्या परिसरात झालेल्या कोट्यवधींच्या जमीन घोटाळ्यातील मुख्य आरोपी म्हणून पाचुंदकर दाम्पत्य सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती पाचुंदकर यांनी सरपंच असताना, सरकारी कागदपत्रांत फेरफार करून तब्बल ७२ गुंठे शासकीय जमीन सासऱ्यांच्या नावावर केली. २००८-०९ मध्ये झालेल्या या बेकायदेशीर हस्तांतरणातून १८ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.

उच्च न्यायालयाने या प्रकरणी पाचुंदकर दाम्पत्याला दणका दिला असून, स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. महसूल विभागाने ही जमीन सरकारजमा करण्याचा निर्णय घेतला होता.

BJP
मुंबईतील 17 हजार कुटुंबांची दिवाळी आधीच दिवाळी! तब्बल 45 वर्षांचा वनवास संपणार

काँग्रेसने भाजपवर निशाणा साधताना म्हटले की, "स्वाती पाचुंदकर, ज्यांच्यावर सरकारी जमीन लाटल्याचा आरोप आहे, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप हे एक असं वॉशिंग मशीन आहे की ज्यात नेत्यांचे गुन्हे आणि भ्रष्टाचार कपड्यांपेक्षाही स्वच्छ धुवून निघतात. आरोप असलेले नेते आत जातात आणि बाहेर येतात जणू काही घडलेच नाही. दोष झाकले जातात, चेहरा चमकदार होतो आणि जनतेचा मात्र फक्त विश्वासघात होतो."

विशेष म्हणजे, जमीन घोटाळ्यात अडकलेल्या या दाम्पत्यावर रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदाचा गैरवापर केल्याचा आणि ट्रस्टमध्येही गैरकारभार केल्याचा आरोप गावकऱ्यांकडून होत आहे. राजकीय व्यक्तीला ट्रस्टचे अध्यक्षपद स्वीकारता येत नसतानाही स्वाती पाचुंदकर यांनी हे पद वर्षभरापासून आपल्याकडे ठेवले आहे.

BJP
वाळू घाटांचे लिलाव 15 दिवसांत; कामचुकारांवर कडक कारवाई करा

ज्या दाम्पत्यावर उच्च न्यायालयाने दणका देत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, ज्यांच्या विरोधात मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांकडे ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत, तेच पाचुंदकर दाम्पत्य आता भाजपमध्ये सामील झाल्यामुळे, त्यांच्यावर असलेली कारवाईची टांगती तलवार आता हटणार की काय? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com