Kandalvan
KandalvanTendernama

मुंबईत ७५ कोटींतून ३८ हेक्टरवर साकारतेय पहिले कांदळवन; उत्सुकता...

Published on

मुंबई (Mumbai) : भारतातील पहिले कांदळवन उद्यान बोरिवलीमधील गोराई खाडीलगत गोराई येथे आठ हेक्टर आणि दहिसर येथे ३० हेक्टर क्षेत्रावर विकसित केले जात आहे. त्यासाठी सुमारे ७५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सिंगापूर, अबूधाबी, थायलंड या देशांमध्ये असलेला कांदळवनातील ७०० मीटर लांबीचा उन्नत मार्ग (बोर्ड वॉक) गोराईतील मुख्य आकर्षण असणार आहे.

Kandalvan
अखेर शिंदे सरकारने राज्यातील कामांवरील उठवली स्थगिती

मुंबईला लाभलेल्या समुद्र किनारा आणि कांदळवनामुळे जैवविविधता तग धरुन आहे. या निसर्गसंपदेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी; तसेच त्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी वन विभागाच्या कांदळवन कक्षाने ‘पर्यावरण पर्यटन प्रकल्प’ हाती घेतला आहे. त्याचबरोबर कांदळवन संवर्धन केंद्र आणि कांदळवन उद्यान उभे करण्यात येत आहे. गोराई येथे आठ हेक्टर क्षेत्रावर २६.९७ कोटी रुपये खर्च करून, तर दहिसर येथे ३० हेक्टर क्षेत्रावर ४८.८० कोटी रुपये खर्च करून कांदळवन उद्यान विकसित केले जाणार आहे. गोराई कांदळवन उद्यान हे गोराई जेट्टीजवळ असून तेथे समृद्ध कांदळवने दिसतात. तेथे निसर्ग पर्यटन केंद्र आणि कांदळवन उन्नत मार्ग हे मुख्य आकर्षण आहे. सध्या निसर्ग पर्यटन केंद्राचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. एकही झाड न तोडता, निसर्गाची हानी होणार नाही, अशापद्धतीने कांदळवन उद्यानाची निर्मिती होणार आहे. हे उद्यान सर्वसामान्यांना आकर्षित आणि शिक्षित करेल, अशी रचना तयार करण्यात आली आहे. उद्यानाला भेट देणाऱ्यांना मुंबईतील कांदळवन परिसंस्थेचे महत्त्व, कांदळवनाचे मानवाला असणारे फायदे समजणार आहेत. यासह कांदळवनाच्या संवर्धनाची आवश्यकता आणि संवर्धनासाठी उपाय कोणते याची माहिती मिळणार आहे. कांदळवन उद्यानाची माहिती देणारे एक ॲप तयार करण्यात येत आहे.

Kandalvan
सरकारचा 'फोकस' पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर; 'या' योजनेला मंजुरी

सिंगापूर, अबूधाबी, थायलंड या देशात असलेल्या कांदळवनातील उन्नत मार्गासारखा उन्नत मार्ग गोराईत तयार करण्यात येणार आहे. हा मार्ग लाकडी असून त्याची लांबी ७०० मीटर आणि रुंदी २.४ मीटर असेल. तसेच या मार्गाच्या जागोजागी विश्रांतीस्थळ आणि माहितीस्थळ उभारण्यात येणार आहेत. या उन्नत मार्गाचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. हा उन्नत मार्ग तयार करताना कोणत्याही वनस्पतीची हानी होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. दाट कांदळवनात आणि क्षेपणभूमीच्या परिसरात साकारण्यात येणाऱ्या या केंद्रात कांदळवन परिसंस्थेतील वनस्पती आणि प्राण्यांची माहिती देऊन जनजागृती करण्यात येणार आहे. हरित उर्जेचा वापर आणि उर्जेचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने १२० किलोवॅट प्रतितास क्षमतेच्या ‘बिल्डिंग इंटिग्रेटेड फोटो व्होल्टिक’ (बीआयपीव्ही ) प्रणालीच्या माध्यमातून सौरउर्जा निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्यानाची एकूण ८० टक्के उर्जेची गरज पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मार्च २०२३ पर्यंत या उद्यानाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Tendernama
www.tendernama.com