'टेंडरनामा'च्या मारुती कंदलेंना शोध पत्रकारिता पुरस्कार

मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची मुंबईत घोषणा
Maruti Kandale
Maruti KandaleTendernama

मुंबई (Mumbai) : मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने पत्रकार प्रमोद भागवत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा 'प्रमोद भागवत शोध पत्रकारिता पुरस्कार' 'टेंडरनामा'चे प्रतिनिधी मारुती कंदले यांना जाहीर झाला आहे. तसेच, 'दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार' यंदा ज्येष्ठ पत्रकार, चित्रकार प्रकाश बाळ जोशी यांना देण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी आज (ता. २०) मुंबईत केली. (Investigative Journalism Award to Maruti Kandale of tendernama.com)

Maruti Kandale
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसची वेळ बदलणार; कारण...

५०० कोटींच्या घोटाळ्याची बातमी गाजली

'टेंडरनामा'ने मार्च २०२३ मध्ये 'DGIPR मध्ये ५०० कोटींचा जाहिरात घोटाळा; मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेशिवाय प्रसिद्धीची खैरात' ही कंदले यांची विशेष बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची सर्वत्र मोठी चर्चा झाली होती. याशिवाय कंदले यांनी गेल्या काही महिन्यांत शोध पत्रकारितेच्या माध्यमातून केलेल्या वेगळ्या विषयांची दखल घेत हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यकारिणीची विशेष बैठक काल परिषदेच्या मुंबईतील कार्यालयात पार पडली. बैठकीत २०२२ चे पुरस्कार निश्चित करण्यात आले. त्यानुसार यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रकाश जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे. २५ हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी दिनू रणदिवे, मा. गो. वैध, पंढरीनाथ सावंत आदी वरिष्ठ पत्रकारांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

Maruti Kandale
EXCLUSIVE : DGIPRमध्ये 500 कोटींचा जाहिरात घोटाळा!

परिषदेचे अन्य पुरस्कार देखील यावेळी जाहीर करण्यात आले आहेत.

- प्रतिष्ठेचा आचार्य अत्रे पुरस्कार कोल्हापूर लोकमतचे संपादक वसंतराव भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे.

- पत्रकार शशिकांत सांडभोर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ टीव्ही पत्रकाराला दिला जाणारा पुरस्कार "न्यूज १८ लोकमत" चे मिलिंद भागवत यांना देण्यात येणार आहे.

- पत्रकार प्रमोद भागवत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा 'प्रमोद भागवत शोध पत्रकारिता पुरस्कार' 'टेंडरनामा'चे प्रतिनिधी मारुती कंदले यांना दिला जाणार आहे.

- महिला पत्रकारांसाठी दिला जाणारा "सावित्रीबाई फुले पत्रकारिता पुरस्कारासाठी" यावर्षी 'मॅक्स महाराष्ट्र'च्या प्रियदर्शनी हिंगे यांची निवड करण्यात आली आहे.

- अकोला येथील पत्रकार भगवंतराव इंगळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा पुरस्कार यंदा धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर यांना दिला जात आहे.

- मराठवाड्यातील पत्रकारांसाठी असलेला नागोजीराव दुधगावकर पुरस्कार यावर्षी छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ पत्रकार स. सो. खंडाळकर यांना देण्यात येत असून, कोकणातील पत्रकारासाठीचा रावसाहेब गोगटे पुरस्कार संगमेश्वर येथील ज्येष्ठ पत्रकार जे. डी. पराडकर यांना दिला जात आहे.

- दत्ताजीराव तटकरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रायगड जिल्ह्यातील पत्रकारास दिला जाणारा पुरस्कार 'न्यूज 18 लोकमत'चे रायगड प्रतिनिधी मोहन जाधव यांना जाहीर करण्यात आला आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत मे महिन्यात तिसऱ्या आठवड्यात मुंबईत पुरस्कार वितरण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीस एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विभागीय सचिव दीपक कैतके, मुंबई अध्यक्ष राजा आदाटे आदी उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त सर्व पत्रकारांचे मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

Maruti Kandale
'टेंडरनामा'ने उघड केलेला 500 कोटींचा घोटाळा गाजला विधान परिषदेतही

बातमी आणि पडसाद...

फडणवीस सरकारच्या काळात गृहनिर्माण विभागाच्या एका फाईलवर "मुख्यमंत्र्यांना अवगत केले आहे", असा शेरा मारल्यामुळे तत्कालीन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचे मंत्रिपद गेले होते. याच धर्तीवर "मुख्यमंत्र्यांना अवगत केले आहे", असा शेरा मारून राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागातील (DGIPR) सुमारे ५०० कोटींहून अधिकचा जाहिरात घोटाळा उघडकीस आला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मान्यता न घेताच अनेक विभागांकडून प्रसिद्धीच्या टेंडर्सची खैरात करण्यात आली आहे. याच अनुषंगाने सामाजिक न्याय विभागाच्या जाहिरात घोटाळ्याप्रकरणी विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव व सहसचिव, माहिती व जनसंपर्कचे तत्कालीन महासंचालक व माजी संचालक यांच्यासह ८ उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची खात्याअंतर्गत चौकशी करण्याचे आदेश माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले होते.

खात्याअंतर्गत चौकशी प्रस्तावित केलेल्या उच्चपदस्थांमध्ये सध्या मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिवपदी कार्यरत अतिरिक्त पोलीस महासंचालक ब्रिजेश सिंह, सामाजिक न्याय विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव दिनेश वाघमारे, विद्यमान सहसचिव दिनेश डिंगळे, अव्वर सचिव अनिल आहिरे, माहिती व जनसंपर्क विभागाचे माजी संचालक अजय अंबेकर, वरिष्ठ सहाय्यक संचालक ज्ञानोबा इगवे, सहाय्यक अधीक्षक विरेंद्र ठाकूर आदींचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com