

मुंबई (Mumbai): शेत पाणंद रस्ते योजना २०२१ पासून प्रभावीपणे राबविण्यात येत असून, मार्च २०२६ अखेर पर्यंत राज्यात ४५ हजार किलोमीटर लांबीचे शेत पाणंद रस्ते पूर्ण होणार असल्याची माहिती रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली.
तसेच वैयक्तिक लाभ योजनेंतर्गत विहिरी, गोठे आदींसाठी केंद्र व राज्य शासनाकडून सुमारे १,५०० कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, तो लवकरच वितरित करण्यात येणार असल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले.
केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त होणारा निधी थेट कामांसाठी वर्ग करून महाराष्ट्रातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगून रोजगार हमी मंत्री गोगावले म्हणाले की, शेतामध्ये जाणारे पाणंद रस्ते हे थेट शेतकऱ्यांच्या उपयोगाचे आणि फायद्याचे आहेत. मात्र, दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांनी सहकार्य न केल्यास अडचणी निर्माण होतात.
शासनाकडून जागेच्या मोबदल्यासाठी स्वतंत्र तरतूद नसली, तरी रोजगार हमी योजनेतून मजुरी, खडीकरण, माती काम तसेच अनधिकृत अडथळे दूर करण्यासाठी निधी दिला जात आहे. आतापर्यंत १७ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून, २७ ते २८ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते सध्या प्रगतीपथावर आहेत.
मंत्री गोगावले म्हणाले की, यावर्षी मजुरीवर आतापर्यंत ११ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला असून, मार्चपर्यंत हा खर्च १६ ते १७ हजार कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाकडून १०० दिवसांच्या मजुरीचा निधी आणि राज्य शासनाकडून अतिरिक्त निधी देऊन रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. वैयक्तिक लाभ योजनेंतर्गत विहिरी, गोठे आदींसाठी केंद्र व राज्य शासनाकडून सुमारे १,५०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, तो येत्या आठ दिवसांत वितरित करण्यात येणार आहे. रस्त्यांची कामे पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांनाही निधी दिला जाईल आणि कोणालाही वंचित ठेवले जाणार नाही.
आमदार सिद्धार्थ खरात यांनी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता.