Mumbai : मुलुंडमध्ये लवकरच जिल्हा क्रीडा संकुल; साडेसात हजार चौरस मीटरचे दोन भूखंड संपादित
मुंबई (Mumbai) : ईशान्य मुंबईतील क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी, मुलुंड (पूर्व) येथे 7510 चौरस मीटरच्या दोन भूखंडांवर जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. राज्याच्या क्रीडा विभागाने जिल्हा क्रीडा संकुलासाठी दोन्ही भूखंड ताब्यात घेतले आहेत.
मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांनी मुलुंडमधील जिल्हा क्रीडा संकुलाचा प्रस्ताव दिला होता. गेल्या काही वर्षांपासून महसूल, क्रीडा विभाग आदी विविध सरकारी विभागांकडे याबाबतीत पाठपुरावा सुरु होता. कोविड काळात कोटेचा यांनी मुलुंडमधील या प्रस्तावित जिल्हा क्रीडा संकुलातील कोणकोणत्या सुविधा असाव्यात यासाठी लोकांकडून सूचना मागविल्या. नागरिकांनी जिल्हा क्रीडा संकुलासाठी मोलाच्या सूचना दिल्या. “जनतेकडून प्राप्त सूचनांच्या आधारे जिल्हा क्रीडा संकुलासाठी स्विमिंग पूल, इनडोअर बॅडमिंटन कोर्ट, इनडोअर टेबल टेनिस, तिरंदाजी, जिम्नॅस्टिक्स आणि एरोबॅटिक्ससाठी सॉफ्ट फ्लोअरिंग, जिम्नॅशियम, कॅरम, व्हॉलीबॉल कोर्ट आणि बास्केटबॉल कोर्ट यासारख्या सुविधांची मागणी करण्यात आली आहे, असे कोटेचा यांनी सांगितले.
कोटेचा पुढे म्हणाले की, जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासासाठी राज्य शासनाकडे 100 कोटी रुपयांची मागणी केली आहे. ही जागा क्रीडा विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. आता हा प्रकल्प जलदगतीने मार्गी लावण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलासाठी आवश्यक असलेल्या निधीबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाणार आहे. मुलुंड येथील जिल्हा क्रीडा संकुलाचा फायदा ईशान्य मुंबईसह मुंबईतील खेळाडूंना होईल.