मुंबईत मध्य रेल्वेच्या 'या' स्थानकांवर ई चार्जिंगची सुविधा
मुंबई (Mumbai) : मुंबईत इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधेसाठी आता मध्य रेल्वेने पुढाकार घेतला आहे. मध्य रेल्वेच्या नऊ स्थानकांवर आता वाहन चालकांसाठी चार्जिंग सुविधा देण्यात आली आहे. ज्यामुळे वाहन चालकांना रेल्वे स्टेशनवरच वाहन चार्जिंग करता येणार आहे.
वातावरणातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. यात अनेक उपक्रमही राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वेने अनेक स्थानकांवर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधा दिली आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांना गती मिळणार आहे.
मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी रेल्वे स्थानकांवरील ही चार्जिंग सुविधा परवडणारी, कार्यक्षम आणि विश्वासार्ह असेल. यात भारतीय रेल्वेने काही वर्षांत 100 टक्के विद्युतीकरण, विजेचा कमीतकमी वापर, सौर आणि पवन उर्जेसारख्या अक्षय्य उर्जेचा वापर करण्यावर भर दिला आहे. यात ईव्ही चार्जिंग पॉईंट्सची तरतूद हा भारतीय रेल्वेने घेतलेला हरित उपक्रम आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, भायखळा, परळ, कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, भांडुप, कल्याण आणि पनवेल स्थानकांवर ही सुविधा दिली जाणार आहे.