
मुंबई (Mumbai) : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या महाराष्ट्रातील कामांनी मोठा वेग घेतला आहे. या मार्गावर एकमेव भूमिगत स्टेशन असलेल्या वांद्रे कुर्ला संकुलात (Bandra Kurla Complex) पहिला बेस स्लॅब पडला आहे.
विशेष म्हणजे, तब्बल दहा मजली इमारती इतका उंच हा स्लॅब आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स स्टेशनचा प्लॅटफॉर्म जमिनीपासून सुमारे 24 मीटर खोलीवर बांधण्याचे नियोजन आहे. या स्टेशनवर प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स आणि सर्व्हिस फ्लोअर असे तीन मजले असतील.
मुंबईकरांसह संपूर्ण देशातील नागरिकांना बुलेट ट्रेनची प्रतीक्षा लागली आहे. बीकेसीत बुलेट ट्रेन स्टेशनचा पहिला काँक्रीट बेस स्लॅब नुकताच जमिनीपासून अंदाजे 32 मीटर खोलीवर टाकण्यात आला, हा स्लॅब 10 मजली इमारती इतका उंच आहे. हा स्लॅब 3.5 मीटर खोल, 30 मीटर लांब आणि 20 मीटर रुंद आहे.
या स्टेशनसाठी टाकल्या जाणाऱ्या 69 स्लॅबपैकी हा पहिला आहे, जो बुलेट ट्रेन स्टेशनचा सर्वात खालचा भाग आहे. भूमिगत स्टेशनचे बांधकाम तळापासून वर या पद्धतीने केले जात आहे, त्यामुळे स्टेशनचा बेस बनवण्याचे काम सुरू झाले असून काँक्रिटीकरण करण्यात येत आहे.
या स्लॅबसाठी 681 मेट्रिक टन उच्च दर्जाचे स्टील वापरण्यात आले, 6200 रीबार कपलरचा वापर झाला, 2254 घनमीटर M60 ग्रेड काँक्रीट आणि 4283 मेट्रिक टन एग्रीगेटचा वापर करण्यात आला.
या स्टेशनला 6 प्लॅटफॉर्म असतील आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मची लांबी अंदाजे 415 मीटर असेल (जे 16 डब्यांच्या बुलेट ट्रेनसाठी पुरेसे आहेत). हे स्टेशन मेट्रो आणि रस्त्याने जोडले जाईल. तसेच या स्टेशनला दोन एंट्री/एक्झिट पॉइंट्स असणार आहेत.
एक मेट्रो लाईन 2ब च्या लगतच्या मेट्रो स्टेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी असेल आणि दुसरा एमटीएनएल इमारतीच्या दिशेने असणार आहे. प्रवाशांच्या हालचाली आणि सुविधांसाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल अशा पद्धतीने स्थानकाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच नैसर्गिक प्रकाशासाठी स्कायलाईटची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा देशातील पहिला आणि सर्वात मोठा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टचे काम केले जात आहे. 508 कि.मी. लांबीचा हा मुंबई ते अहमदाबाद असा बुलेट ट्रेनचा कॉरीडॉर आहे. ताशी 320 किमीच्या वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिकेवर एकूण 12 स्थानके असणार आहेत.
यामधील आठ स्थानकांची गुजरातमध्ये, तर चार स्थानकांची महाराष्ट्रात उभारणी केली जाणार आहे. यामध्ये वांद्रे - कुर्ला संकुल, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, बडोदा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती या स्थानकांचा समावेश आहे.