BMC Tender: मुंबईत सुरू होणाऱ्या नर्सिंग महाविद्यालयासाठी टेंडर प्रक्रिया सुरू

BMC
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्या वतीने वांद्रे पश्चिम येथील आर. के. पाटकर मार्गावरील भाभा रुग्णालयाजवळ आरक्षित भूखंडावर नर्सिंग महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. हे नर्सिंग महाविद्यालय पीपीपी अर्थात सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर विकसित करण्यात येणार असून त्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे महाविद्यालय महापालिकेने स्वत: उभारावे अशी मागणी होत असतानाच महापालिका आरोग्य विभाग आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे.

BMC
BMC School Purchase: शाळा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक; 157 कोटींच्या साहित्य खरेदीतील दिरंगाईवरून मुंबई महापालिकेत वाद

के.बी.भाभा रुग्णालय वांद्रे (प) येथील भूमापन क्र. १०७६ एमपी ८९, पार्ट क्र १ हा भूखंड आरोग्य विषयक बाबींसाठी आरक्षित ठेवण्यात आलेला आहे. या जागेवर नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्याकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री आशिष शेलार यांच्याशी महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केलेल्या चर्चेनुसार हा प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर (पीपीपी) विकसित करण्याबाबत व टेंडर मागविण्याबाबत महानगरपालिका आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असल्याचे भाभा रुग्णालयाने स्पष्ट केले.

याबाबत मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. यामध्ये त्यांनी वांद्रे (पश्चिम) येथे आर. के. पाटकर मार्गवर भूमापन क्र. १०७६, एमपी ८९, पार्ट क्र.१, मुंबई ५० येथे महानगरपालिकेचा भूखंड असून हा भूभाग आरोग्य विषयक बार्बीसाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. पण त्या भूखंडावर महानगरपालिकेने नर्सिंग महाविद्यालय बांधण्याकरीता निविदा काढली आहे. ही निविदा जेएसडब्ल्यू फाऊंडेशनने भरली.

BMC
सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील वैद्यकीय शिक्षण, आरोग्य सेवेबाबत आली गुड न्यूज

हा भूखंड तीस वर्षासाठी पाच कोटी एकोणतीस लाख एवढ्या किंमतीने भाड्यावर दिला जात आहे. त्यामध्ये चाळीस टक्के जागा महानगरपालिकेला देण्यात येणार आहे. महानगरपालिकेची स्वतःची रुग्णालये तसेच वैद्यकीय महाविद्यालये आहेत. नर्सिंग डिप्लोमा कोर्सही महानगरपालिकेच्या रुग्णालयात शिकवण्यात येतो.

त्यामुळे महानगरपालिकेने हा भूखंड खाजगी संस्थांना विकसित करण्यासाठी न देता स्वतःच नर्सिंग महाविद्यालय चालवावे. जेणेकरुन मराठी मुलींना संधी मिळेल अशी मागणी केली होती. परंतु महापालिका आरोग्य विभाग पीपीपीवर तत्वावरच नर्सिंग महाविद्यालय उभारण्यावर आग्रही असल्याचे दिसून येत आहे.

Tendernama
www.tendernama.com