BMC : पाण्याला वाट करून देण्यासाठी लागणार 209 कोटींची 'वाट'

BMC
BMCTendernama

मुंबई (Mumbai) : पावसाळ्यात अंधेरी सब वेमध्ये (Andheri Sub-way) पाणी साचू नये म्हणून मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाने पाण्याचा निचरा वेगाने करण्यासाठी सब-वेला समांतर रेल्वे रुळांखालून पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नाला रुंदीकरणाची व नाला वळवण्याचीही कामे हाती घेण्यात येणार असून या कामासाठी सुमारे २०९ कोटी खर्च करण्यात येणार आहे. सध्या लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असल्याने त्यानंतर टेंडर (Tender) मागवण्यात येणार आहेत.

BMC
Nashik : नाशिक जिल्ह्यातील 191 पाझर तलाव होणार गाळमुक्त! तब्बल साडेतीन कोटींचा...

मुसळधार पाऊस पडल्यानंतर अंधेरी सब वे, मिलन सब वेसह विविध ठिकाणच्या सखलभागात पाणी साचते. पावसाळ्यात मिलन सब वेमध्ये पाणी साचू नये म्हणून साठवण टाकी बांधण्याचे काम पूर्ण झाले असले तरी अंधेरी सब वे मात्र यंदाच्या पावसाळ्यात पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

अंधेरी पश्चिम परिसरातील मोगरा नाल्याची रुंदी बऱ्याच ठिकाणी कमी असल्यामुळे पाऊस पडत असताना व भरतीच्या वेळी मोगरा नाल्याच्या पाण्याची पातळी वाढते व त्यालगत असलेल्या अंधेरी सब वे, दाऊद बाग, आझाद नगर, वीरा देसाई रोड या परिसरांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन जीवित, तसेच मालमत्तेची हानी होते. हा परिसर बशीसारखा असल्यामुळे पाण्याचा निचराही होण्यास वेळ लागतो.

अंधेरी पश्चिम भागातील पावसाचे पाणी अंधेरी सब वे मार्गे मोगरा नाल्यामधून वाहून पुढे मिल्लत नगर, लोखंडवाला कॉम्प्लेक्सजवळ मालाड खाडीमध्ये विसर्जित होते. या परिस्थितीचा अभ्यास करून महानगरपालिकेने मोगरा नाल्याचे रुंदीकरण करण्याचे ठरवले आहे. तसेच जिथे नाल्याचे रुंदीकरण करणे शक्य नाही अशा ठिकाणी नाला वळवून पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

BMC
Nashik : लोकसहभागातून गाळ काढून गंगापूर धरणाचा साठा 100 कोटी लिटरने वाढवणार

अंधेरी सब वे परिसर सखल भाग असून, जवळच मोठा उतार असल्यामुळे ताशी ५० मिमी पाऊस पडतो तेव्हा प्रति सेकंद ५० हजार लिटर पाणी वेगाने वाहत येते. त्या तुलनेत नाल्याची रुंदी कमी असल्यामुळे पाणी साचते. त्यामुळे नाल्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे, असे पर्जन्य जलवाहिन्या विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

नाल्यातील पाणी पुढे मोगरा उदंचन केंद्रापर्यंत नेऊन मग समुद्रात सोडले जाणार आहे. मात्र मोगरा उदंचन केंद्राचे काम रखडले आहे. परंतु, तोपर्यंत पहिल्या टप्प्यातील कामांसाठी लवकरच टेंडर मागवण्यात येणार आहेत.

सध्या लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असून त्यानंतर टेंडर मागवण्यात येतील. त्यामुळे प्रत्यक्षात पावसाळ्यानंतरच ही कामे सुरू होऊ शकणार आहेत. रेल्वे रुळांखालून नवीन पर्जन्य जलवाहिनी टाकण्यासाठी तीन ते चार वर्षे लागू शकतात.

BMC
Nashik ZP : जिल्हा परिषदेत ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन कामाचा वाढला वेग; 8 दिवसांत 24 कोटींची देयके तयार होऊन मंजूर

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचे काम रखडल्यामुळे मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्यावर्षी सुरू होऊ शकले नाही. या पुलाची एक बाजू नुकतीच सुरू झाली असल्यामुळे अंधेरी सब वे परिसरातील वाहतुकीचा ताण आता थोडा कमी झाला आहे. त्यामुळे आता या कामासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. या कामाकरीता सल्लागार नेमण्यात आला आहे, टेंडरचा मसुदाही तयार झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अंधेरी सब वे येथून अंधेरी स्थानक जवळ असल्यामुळे या रस्त्याचा वापर जास्त होतो. त्यामुळे या पावसाळ्यात अतिवृष्टीच्या वेळी अधिकचे मनुष्यबळ तैनात करणे, पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवणे आणि नाल्याची पाणीपातळी वाढली की वेळीच वाहतूक थांबवणे हे उपाय करावे लागणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com