मुंबईकर लवकरच वापरणार समुद्राचे पाणी; BMCचा कसा आहे प्लॅन?
मुंबई (Mumbai): समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्यासाठी मनोरी येथील प्रस्तावित प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेने (BMC) चौथ्यांदा टेंडर (Tender) काढले असून, यावेळी तब्बल २१ कंपन्यांनी सहभाग दर्शवला आहे. या कंपन्यांमध्ये आखाती देशातील एक कंपनी असून, एक कंपनी स्पेनमधील आहे. या प्रकल्पावर सुमारे तीन ते साडे तीन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
दरम्यान, अंधेरीच्या वर्सोवा समुद्र किनाऱ्यावरही २०० दशलक्षलीटर क्षमतेचा असाच आणखी एक नि:क्षारीकरण प्रकल्प उभारण्याचा महापालिकेचा विचार आहे. वाढत्या लोकसंख्येची पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेने पश्चिम उपनगरातील मनोरी येथे निःक्षारीकरण प्रकल्प उभारण्याची घोषणा २०२१ मध्ये केली होती. डिसेंबर २०२३ मध्ये या प्रकल्पासाठी टेंडर काढण्यात आले. दररोज सुमारे २०० ते ४०० दशलक्षलीटर म्हणजेच २० ते ४० कोटी लीटर पाणी मिळवण्याची या प्रकल्पाची क्षमता असेल. मात्र हा प्रकल्प अजूनही टेंडर प्रक्रियेत रखडला आहे.
मुंबईतील लोकसंख्या झपाट्याने वाढत असून त्या तुलनेत पाणी पुरवठ्यासाठीच्या जलाशयात वाढ झालेली नाही. मुंबईची सगळी भिस्त ही पावसाच्या पाण्यावर असून पाणी पुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमधील पाणीसाठ्यावरच मुंबईकरांना अवलंबून राहावे लागते. त्यामुळे पावसाव्यतिरिक्तच्या पर्यायी जलस्रोताची भविष्यात गरज भासणार आहे. त्याकरीता मुंबई महापालिकेने निःक्षारीकरण प्रकल्पाची घोषणा केली.
मुंबई महानगरपालिकेने मनोरीसह पश्चिम उपनगरातील अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर असाच आणखी एक प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे. २०० दशलक्षलीटर याच क्षमतेच्या प्रकल्पासाठी मुंबई महानगरपालिकेने स्वारस्य पत्र मागवले आहेत. सध्या या प्रकल्पासाठी योग्य तंत्रज्ञान सुचवण्यासाठी या क्षेत्रातील कंपन्यांकडून स्वारस्य अर्ज मागवण्यात आले आहेत. प्रकल्प उभारण्यासाठी आराखडा, निर्मिती, वित्त संचालन आणि हस्तांतरण मॉडेल अंतर्गत हे स्वारस्य अर्ज मागवण्यात आले आहेत.
पाण्याच्या वाढत्या मागणीसाठी मुंबईची लोकसंख्या गेल्या दहा वर्षात झपाट्याने वाढली आहे. मात्र त्या तुलनेत पाणीसाठा वाढलेला नाही. मध्य वैतरणा धरण २०१४ मध्ये बांधून पूर्ण झाल्यानंतर गेल्या दहा वर्षात एकही नवीन धरण मुंबई महापालिकेने बांधलेले नाही. पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य सरकाने काही वर्षांपूर्वी नेमलेल्या डॉ. एम. ए. चितळे यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार मुंबई महापालिकेने गारगाई, पिंजाळ व दमणगंगा असे तीन प्रकल्प हाती घेतले होते. गारगाई धरण प्रकल्पासाठी पाच लाख झाडे कापावी लागणार असल्यामुळे ठाकरे सरकारच्या काळात मुंबई महापालिकेने हा प्रकल्प बाजूला ठेवला होता. लवकरच हा प्रकल्प देखील मार्गी लागण्याची शक्यता आहे.