'या' महापालिकेच्या घनकचरा टेंडरमध्ये 500 कोटींचा घोटाळा; भाजपच्या आरोपाने खळबळ

scam
scamTendernama

मुंबई (Mumbai) : मीरा भाईंदर महापालिकेने शहरातील दैनंदिन साफसफाई व कचरा संकलन-वाहतुकीसाठी दोन ठेकेदारांना दिलेल्या टेंडरमध्ये तब्बल ५०० कोटींचा घोटाळा असून याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष व मीरा भाईंदर १४५ विधानसभा निवडणूक प्रमुख ऍड. रवी व्यास यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापालिका आयुक्त संजय काटकर यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.

scam
'त्या' मल्टिमॉडेल कॉरिडॉरसाठी मार्चमध्ये टेंडर; 55 हजार कोटींचे बजेट

व्यास म्हणाले की, महापालिकेने साफसफाई व कचरा वाहतुकीसाठी प्रभाग समिती १, २ व ३ चा एक झोन करून त्याचे टेंडर ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंटला जुलै २०२३ मध्ये दिले आहे. तर त्याआधी प्रभाग समिती ४, ५ व ६ मिळून झोन  दोनसाठी मे. कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांना मार्च २०२३ मध्ये टेंडर दिले आहे. हे टेंडर ५ वर्षांसाठी देण्यात आले आहे. २०१२ मध्ये ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंटला साफसफाईचे टेंडर देताना पहिल्या वर्षी ३९ कोटी व नंतर दरवर्षी वाढत जाऊन २०२३ मध्ये ९० कोटीपर्यंत पोहोचले होते. ठेकेदाराची वाहने, कामगार आदी धरून देखील २०२३ मध्ये ९० कोटी वर्षाला खर्च केला गेला असताना नव्याने टेंडर देताना तब्बल १५० कोटी रुपये पहिल्या वर्षात खर्च केले जाणार आहेत. शिवाय दरवर्षी त्यात वाढ केली जाणार आहे. ठेक्यात सफाई कामगारांना किमान वेतन नुसार प्रतिदिन १ हजार ३३ रुपये देय असताना प्रतिदिन १ हजार ३९९ रुपये निश्चित करून पैसे ठेकेदारास दिले जात आहेत. दररोज सुमारे १८०० सफाई कामगार काम करत असल्याचे विचारात घेता रोज प्रति कामगारांच्या नावाखाली ३६६ रुपये जास्त देऊन ५ वर्षांकरिता तब्बल १२० कोटी २३ लाख रुपये ठेकेदारांना जास्त मिळणार आहेत. बोनस व ग्रॅच्युटीसुद्धा मासिक देयकात दिली जात आहे.

scam
Mumbai : पूर्व उपनगरातील नागरिकांसाठी गुड न्यूज; 'त्या' सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी 503 कोटींचे टेंडर

आधीच्या ठेक्यात कचरा वाहक वाहने ठेकेदाराची होती व ३ टन क्षमतेच्या वाहनासाठी दररोज ७ हजार ८२६ रुपये महापालिका देत होती. परंतु आता तर कचरा वाहक वाहने महापालिकेची असून देखील ठेकेदारास प्रति वाहन दररोज १३ हजार २०० रुपये महापालिका देत आहे. महापालिकेचे वाहन आणि पैसे देखील जास्त असा हा गैरप्रकार असून प्रतिदिन ५ हजार ३७४ रुपयांचा फरक पाहता ५ वर्षात ठेकेदारास १८० कोटी ४४ लाख रुपये जास्त दिले जाणार आहेत. कचरा गाड्यांवर लागणारे कामगार हे प्रति वाहनाच्या खर्चात समाविष्ट असताना वाहनांवर कामगार मात्र १८०० कामगारांमधीलच घेतले जात आहेत असा आरोप यावेळी व्यास यांनी केला आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी संगनमत करून हे दोनच ठेकेदार पात्र ठरतील त्यानुसार टेंडरच्या अटीशर्ती तयार केल्या. झोन २ मध्ये ग्लोबलने टेंडर भरले असताना त्यांनी ती मागे घेतली व कोणार्कचा मार्ग मोकळा केला. टेंडर मागे घेतल्याने ग्लोबलची अनामत रक्कम जप्त करून त्याला काळ्या यादीत टाकणे आवश्यक असताना महापालिकेने तसे केले नाही. दोन्ही ठेकेदारांना प्रचंड आर्थिक फायदा करून देण्यासाठी महापालिकेने संगनमताने हे कारस्थान करून महापालिका आणि शहरातील करदात्या नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान चालवले आहे. हा सुमारे ५०० कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप करत दोन्ही ठेकेदारांचे टेंडर रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकणे व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याचे यावेळी ऍड. रवी व्यास यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत माजी सभापती सुरेश खंडेलवाल व पंकज पांडेय, गजेंद्र भंडारी आदी उपस्थित होते. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com