
मुंबई (Mumbai): राज्यात हाताने मैला स्वच्छ करणे अथवा डोक्यावर मैला वाहून नेण्याचे काम संपुष्टात आणण्यासाठी शासन संवेदनशीलपणे प्रयत्न करीत आहे. ही सर्व कामे रोबोटिक मशीनद्वारे होण्यासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.
यासंदर्भात शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. यासंदर्भात सदस्य अतुल भातखळकर यांनी प्रश्न मांडला होता. याबाबत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, लाड - पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत आणि मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना संपूर्ण सहकार्य करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. या प्रश्नाबाबत लवकरच संबंधित विभागांची उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल. या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
या प्रश्नाच्या उत्तरात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कार्यवाही करत रोबोटिक मशीन खरेदी करण्यात येत आहे. त्यासाठी शासनाने ५०४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी १०० कोटी रुपये नगर विकास विभागामार्फत मशीन खरेदीसाठी देण्यात आले आहेत. उर्वरित मशीन पुढील तीन महिन्यांमध्ये खरेदी करण्यात येतील.
मैला स्वच्छ करताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ३० लाख रुपये, कायम अपंगत्व आलेल्यांना २० लाख आणि कमी अपंगत्व आलेल्या कर्मचाऱ्यांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. राज्यामध्ये ६ हजार ३२४ व्यक्तींच्या बँक खात्यामध्ये आर्थिक मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे, असेही सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी सांगितले. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य सुधीर मुनगंटीवार, विश्वजित कदम, संजय केळकर यांनी सहभाग घेतला.