
मुंबई (Mumbai) : मुंबईत तब्बल साडेआठ हजार कोटींची कामे ठप्प आहेत आणि ही रस्त्यांची काम होऊ नयेत यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी एनओसी देऊ नये यासाठी त्यांच्यावर खोके सरकारकडून दबाव आहे, असा खळबळजनक आरोप आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज केला आहे. आमचे सरकार आल्यानंतर या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. ते 'मातोश्री' येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांच्या रखडलेल्या कामांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
ज्या शहरांमध्ये प्रशासक आहेत त्या शहरांमध्ये घोटाळे सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, गेले 10 ते 12 महिने आम्ही रस्त्यांचा विषय मांडत आहोत. मुंबईत पाच पॅकेट कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांपैकी एका कॉन्ट्रॅक्टरला टर्मिनेशन नोटीस गेली. या नोटिशीला कंत्राटदाराने उत्तर दिले. त्याची सुनावणी महापालिकेत या आठवड्यात होणार आहे. या सुनावणीनंतर कंत्राटदारावर कारवाई होते की खोके घेऊन कारवाई थांबवली जाते हे आम्हाला बघायचे आहे.
एका वर्षात खड्डेमुक्त मुंबई करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मुंबईत रस्त्याची कामे 1 ऑक्टोबर ते 31 मेपर्यंत पूर्ण होतील, असे राज्य सरकारने सांगितले आहे. पण मुंबईत एकाही रस्ते कामाला सुरुवात झालेली नाही. अडीच हजार कोटींची कामे तशीच्या तशी पडून आहेत. ट्रॅफिक पोलिसांची एनओसी न मिळाल्याचे दाखवून रस्त्याची कामे रखडवली जात आहेत. मोठा गाजावाजा करुन सहा हजार कोटींच्या कामांची घोषणा केली, नारळ फोडला. पण ती कामेही ठप्पच आहेत, असा आरोप ठाकरे यांनी केला.
मुंबईत धुळीमुळे मोठे प्रदूषण होत आहे. त्याच त्या गाईडलाईन काढल्या जात आहेत. कन्स्ट्रक्शन साईटवरुन येणाऱ्या धुळीवर कोणतेही नियंत्रण नाही. 24 पैकी 15 वॉर्डमध्ये वॉर्ड ऑफिसर नाही. परीक्षा होऊन निकालही लागला पण नियुक्त्या खोक्यांसाठी थांबल्या असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.