
मुंबई (Mumbai) : भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर अदानी कंपनी मुंबईला गिळायला निघाली आहे. या कंपनीला भाजप सरकार मोठ्या प्रमाणात सवलती देत आहे. मुंबईकर कर भरत असतानाही सर्वाधिक फायदा हा अदानीला मिळत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार मुंबईकरांवर आणखी एक अदानी कर लादणार आहे, अशी खोचक टीका युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.
कमी आणि अशुद्ध पाणीपुरवठा, खराब हवामान, वाढते प्रदूषण, जागोजागी सुरू असलेले खोदकाम यामुळे मुंबईकरांचे हाल सुरू आहेत. मुंबईकरांच्या या प्रश्नांना उत्तरे द्यायला कोणीच नसल्याचे सांगतानाच देवनार येथील डम्पिग ग्राऊंडची जागा अदानी समूहाला दिली जाणार आहे. ती जागा स्वच्छ करून देण्यासाठी दोन-अडीच हजार कोटी रुपयांचे टेंडर काढले जाणार असल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्ला चढवला.
राज्यात अदानी समूहाचे सरकार आले आहे. अदानी समूह म्हणजेच भाजप सरकार आहे. हे सरकार आल्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे आमदार खोटे बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. धारावीच्या विकासाकरिता बाजारभावापेक्षा दहापट कमीदराने कुर्ला येथील मदर डेअरी अदानीला दिली जाणार असल्याचे समजते आहे, असा आरोपही त्यांनी केला.
भाजप सरकार मुंबईतील सगळ्या जमिनी अदानीच्या घशात घालत आहेत. सगळे काही अदानीला द्यायचे असेल तर हा अदानी कर नक्की काय आहे? कराचा बोझा मुंबईकरांवर आणि जमीन अदानीला हा कोणता न्याय भाजपने आणला आहे?
- आदित्य ठाकरे, आमदार