

मुंबई (Mumbai): सिडको, पीएमसी हद्दीतील विकासकामांचे नियोजन, प्रगतीपथावर असलेल्या विकासकामांवर देखरेख, नियंत्रण यासाठी महानगरपालिका प्रतिनिधी, सिडको प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त समिती स्थापन करण्याबाबत शासनस्तरावर उचित निर्णय घेण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.
नवी मुंबई, पनवेल महानगरपालिका, नैना प्रकल्प क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकासकामे, विकासप्रकल्प सुरू आहेत. या विकासकामांचा, प्रकल्पांचा मुख्यमंत्री वॉररूममार्फत नियमित आढावा घेतला जात असल्याचेही राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले.
राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले, पनवेल महानगरपालिका नागरी क्षेत्रात वाढ होत असल्याने पनवेल महानगरपालिकेने सुधारित नागरी विकास आराखडा (डीपी) शासनास सादर केला असून या आराखड्यात रस्ते व मूलभूत पायाभूत सोयी सुविधांचा समावेश आहे. पनवेल महानगरपालिकेची सुधारित व एकत्रित प्रारूप विकास योजना शासनाकडे मंजुरीस्तव विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.
खारघर सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) हा खारघर सेक्टर-१६ येथील डीएव्ही स्कूल येथे सुरू होऊन सीबीडी बेलापूर मार्गे सीवूड्स सेक्टर-५२ मधील डीपीएस शाळेजवळ पाम बीच रोडला जोडला जाईल. तसेच पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील नवीन पनवेल रोडसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उत्तरेकडील रस्ता उपलब्ध असून हा रस्ता जोड रस्त्यामार्फत खारघर कोस्टल रोडला जोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले.
तसेच विकास प्रकल्पांच्या कामात सदस्यांनी सूचविलेल्या सूचनांचा विचार केला जाईल असेही त्यांनी सांगितले. आमदार विक्रांत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला होता.