
मुंबई (Mumbai) : पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर यांना जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या कामात तब्बल ६ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आधीच्या आराखड्यानुसार प्रकल्प खर्च फक्त ८ हजार कोटींपर्यंत अपेक्षित होता.
या प्रकल्पाअंतर्गत दोन भूमिगत बोगदे खोदण्यात येणार आहेत. या भुयारी मार्गांवर तब्बल ६ हजार कोटींचा तर उर्वरित संपूर्ण कामासाठी ८ हजार कोटींचा खर्च केला जाणार आहे. गोरेगाव आणि मुलुंड लिंक रोड हा संपूर्ण मार्ग १२.२ किलोमीटर लांबीचा आणि भुयारी मार्ग अंदाजे ३ किलोमीटर लांबीचे आहेत.
मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत वाढच होत आहे. यात वेळ व इंधन वाया जाते. पूर्व उपनगरातून पश्चिम उपनगरात जाण्यासाठी ठराविकच मार्ग आहेत. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी होते. विशेषतः मुलुंड येथून पश्चिम उपनगरात जाण्यासाठी पवई मार्गे ये-जा करावी लागते.
यास्तव पूर्व आणि पश्चिम उपनगरातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मागणीवरून महापालिकेने गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे काम हाती घेतले. मात्र त्यामध्ये अधिकृत आणि अनधिकृत बांधकामांचा मोठा अडथळा निर्माण झाला होता. त्यावर कारवाई करीत आणि तोडगा काढीत महापालिकेने गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे काम चालू ठेवले आहे.
या प्रकल्पाअंतर्गत दोन भूमिगत बोगदे खोदण्यात येणार आहेत. भुयारी मार्गाच्या जागेत आणि कामात काही मोठे बदल केले आहेत. दोन भुयारी मार्गांच्या कामासाठी महापालिकेला तब्बल ६ हजार कोटींचा खर्च येत आहे. तर उर्वरित संपूर्ण कामासाठी ८ हजार कोटींचा खर्च येणार आहे. गोरेगाव आणि मुलुंड लिंक रोड हा संपूर्ण मार्ग 12.2 किमी लांबीचा आहे. तर अंदाजे 3 किमी लांबीचे भुयारी मार्ग आहेत. त्यामुळे या एकूणच कामासाठी तब्बल 14 हजार कोटींचा खर्च येत आहे.
या एकूण खर्चात भुयारी कामाच्या अंतर्गत 250 कोटी रुपयांची वाढ झाली असून त्यास आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. भुयारी मार्गाच्या कामासाठी चीनमधून टीबीएम (टनेल बोरिंग मशीन) मशीन आणण्यात येणार आहे. सध्या या प्रकल्पाच्या अंतर्गत टीबीएम मशीनद्वारे भुयारी काम करण्यासाठी अगोदर खोल विहिरीचे खोदकाम करण्यात येत आहे.
ते पूर्ण झाल्यावर चीन येथून टीबीएम मशीन आणून भुयारी खोदकामाला सुरुवात करण्यात येणार आहे. गोरेगाव आणि मुलुंड जोडरस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा मिळणार आहे.