छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सर्वच पातळ्यांवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे प्रशासन ढेपाळले आहे. कामे होत नाहीत आणि दिलेल्या वेळा पाळल्या जातच नाहीत. मस्तवाल बेशिस्त बेफिकिरी कारभारामुळे यात शेवटी भरडला जातोय तो सामान्य माणूसच. त्याच्या वेदनांचे मात्र कुणालाच सोयर-सुतक उरलेले नाही. असेच एका छोट्याशा तगाद्यातून महानगरपालिका प्रशासन कशा पध्दतीने जेष्ठ नागरिकांचा छळ करते हे 'टेंडरनामा'च्या तपासातून समोर आले आहे.
शहरात दररोज कुठे ना कुठे कचऱ्याचे दर्शन होते. जलवाहिनी फुटलेली असते. तर कुठे मलनिःसारण वाहिनीची गटारगंगा वाहत असते. दिवसा पथदिवे सुरू, रात्री बंद हा तर नित्याचाच खेळ आहे. त्याच्या देखभाल दुरूस्तीसाठी महानगरपालिकेत दुय्यम आवेशक, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, उप अभियंता, मंजूर ते शहर अभियंता आदी पदभार असणाऱ्यांची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाच्या नियमानुसार या कारभाऱ्यांची असते.
घन कचऱ्यासाठी स्वतंत्र विभाग आहे. यात सह आयुक्त, प्रभाग अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, जवान, मजूर अशी अनेक पदे आहेत. पण, शहरात प्रत्येक रस्त्यांवर कचऱ्याचे ढिग, चिखल , खाच खळगे आणि फुटलेल्या मलनिःसारण वाहिनीच्या गटारगंगेतून नरक यातना सोसत शहर वासियांना मार्ग पार करावा लागत आहे. एवढ्या समस्यांचा बोजवारा फुगला असताना, तरी छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील कारभाऱ्यांच्या चेहऱ्यावर सगळाच 'आनंदीआनंद' असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा सावळागोंधळ निस्तरणार कधी? प्रशासनाला शिस्त लावणार कधी? आणि (अ)स्मार्ट शहराला स्मार्ट करणार कधी? बेजबाबदार कारभाऱ्यांना वठणीवर आणणार कधी? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
प्रशासन इतकं ढेपाळले आहे की अन्य यातील यंत्रणाही त्याला दाद देईनाशा झाल्या आहेत. चार महिन्यांपूर्वी अर्थात १८ डिसेंबर २०२३ रोजी हर्सूल परिसरातील प्रभाग क्रमांक - ४ येथील मयूरपार्क, मारोती नगर येथील जेष्ठ नागरिकांनी वार्ड अधिकाऱ्यांबरोबर महानगरपालिकेच्या प्रशासकांना जुनी मलनिःसारण वाहिनी बदलून नवीन मलनिःसारण वाहिनी टाकण्यासाठी व चेंबर नव्याने बांधण्यासाठी पत्र व्यवहार केला होता.
महानगरपालिकेच्या हेल्पलाईनवर देखील तक्रार केली. मात्र ही सारी यंत्रणा 'आता वार्ड अभियंता करतील ना काम' म्हणून निवांत आहे. त्यांच्या लेखी ही फूटकळ तक्रार असावी. मात्र नागरिकांच्या तक्रारीला चार महिने उलटूनही त्यांचे काम होईना. अद्यापही तिकडे मलनिःसारण वाहिनी व चेंबरचे काम झालेले नाही. एव्हाना वार्ड अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि महानगरपालिका प्रशासकांच्या या भागातील नागरिकांनी केलेली तक्रार आल्याचे त्यांच्या गावीही नाही. कदाचित म्हणूनच महापालिकेतील कामांसाठी सामांन्यांना ताटकळावं लागत असावे.
शहरातील हर्सुल परिसरातील प्रभाग क्रमांक - ४ मारोती नगर, मयुरपार्क भागात मलनिःसारण वाहिनी जुनाट झाल्या आहेत. वारंवार फुटून रस्त्यांवर गटारगंगा वाहते. चेंबर ओव्हरफ्लो होते. परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डास चिलटांचा त्रास वाढला आहे. गटारगंगा ओलांडत नागरिकांना रस्ते पार करावे लागतात. दुर्गंधीचा जीवघेणा त्रास सुरू आहे. मलनिःसारण वाहिनी व चेंबर बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी या भागातील नागरिकांची चार महिन्यापासून वार्ड कार्यालय ते महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारतीचे उंबरठे झिजवणे सुरू आहे.
महानगरपालिकेकडे रितसर तक्रार करून मागणी केलेली आहे. मात्र महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागाची कर्तव्यताच शुन्य झाली आहे. पण, नागरिकांच्या तक्रारीनंतर लक्ष देण्यास गेल्या चार महिन्यांपासून या विभागाला फुरसत झालेली नाही. यावरून महानगरपालिकेचे काम आणि चार महिने थांब', हा सर्वसामान्य माणसाला पदोपदी येत राहणारा प्रत्यय येत आहे. कामकाजात इतकी अनागोंदी असतांना प्रशासकांचे लक्ष नाही. या सगळ्यामुळे भरडला जातोय तो सर्वसामान्यच. पण, त्याचे कोणालाही सोयर सुतक नाही.