छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील फुलेनगर रेल्वेगेट एमआयटी ते बीड बायपास राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरील उद्योग कमल अपार्टमेंट लगत नवीन सिमेंट रस्त्याच्या बड्या नाल्यावरील पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होऊन प्रवास सुखकर होणार, अशी आश्वासने स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या कारभाऱ्यांनी छातीठोकपणे दिली होती. मात्र ती पाण्यात विरघळी आहेत.
आजही येथील जुन्याच धोकादायक पुलांवरून वाहतूक होत आहे. विशेष म्हणजे, या नाल्यावर पुराचे पाणी जाऊन ११ लोकांचा बळी घेतला आहे. पुलावरून यंदाही पाणी जाण्याची दाट शक्यता आहे. अरूंद रस्ता आणि पुलाच्या बांधकामामुळे खोदून ठेवलेल्या खटक्यांच्या आतून - बाहेर वाहन चढवताना प्रवाशांना दमछाक सोसावी लागत आहे. त्यामुळे अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर वाहतूक खोळंबत आहे. त्यामुळे नवीन पुलाचे काम कधी पूर्ण होणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
एका भागात पूल दुर्घटनेनंतर राज्यातील अनेक जुन्या व धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यासंदर्भात शहरातील एका विधिज्ञाने खड्डेमय रस्त्यांच्या याचिकेबरोबरच यावेळी शहरातील धोकादायक उड्डाणपुलांचा प्रश्न न्यायालयात उपस्थित केला होता. शहरातील जालना रोडवरील सिडको, सेव्हन हील, मोंढानाका, क्रांतीचौक, महावीर चौक, रेल्वेस्टेशन, टाउन हाॅल या महामार्गावरील वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या पुलांना अधिक मजबूत व क्षमतेचे करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत, पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यात सुधारणा कराव्यात, पुलांच्या कठड्यांची व दुभाजकांची उंची वाढवा, अशा सूचना न्यायालयाने केल्या होत्या. मात्र अद्याप, बांधकाम, मनपा आणि एमएसआरडीसीने कुठलीही उपाय योजना केली नाही. त्यात शहरातील नदी नाल्यांवर असलेल्या पुलांची कोण दखल घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील उस्मानपुरा भागातून सातारा एमआयडीसी कडून जाणारा फुलेनगर रेल्वेगेट ते एमआयटी काॅलेजकडे जाणाऱ्या व बीड बायपास या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या सिमेंट रस्त्याचे काम मागील २ वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. या मार्गावर नाल्यावरील नवीन पुलांचे काम वर्षभरापासून रखडले आहे. परिणामी, जुन्या धोकादायक पुलांवरून सध्या वाहतूक सुरू आहे. दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या नाल्यांवरील छोट्या नळकांडी पुलांवरून पाणी गेल्याने वाहतूक देखील खोळंबते. यामुळे प्रवासी, चाकरमानी व वाहन चालकांची खूप गैरसोय होते.
त्यात फुलेनगर रेल्वेगेट ते एमआयटी काॅलेज हा मार्ग सुस्थितीत यावा, येथील पूल नव्याने बांधण्यात यावेत, यासाठी वारंवार आंदोलने केली गेली. मात्र प्रशासनाकडून कोणतीही जलद कार्यवाही करण्यात आली नाही. या ठिकाणी तब्बल सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी सव्वा कोटीची तरतूद करण्यात आली होती. मार्गावरील नाल्यावर दोन नळकांडी पूल होते. यातील पहिल्या पुलाचे बांधकाम न करता त्यावरच काँक्रिटची कामे करण्यात आल्याने हा पहिला पूल इतकं ओझं पेलेलं काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसऱ्या पुलावर अधिक क्षमता, रुंदी आणि उंचीचे पूल तयार होत आहेत.
या ठिकाणच्या या दुसऱ्या पूलाचे काम जून महिन्याच्या आधी पूर्ण होऊन तेथून वाहतूक सुरू होणे अपेक्षित होते. मात्र स्मार्ट सिटीच्या कंत्राटदाराने अद्याप आयआयटी कडून डीझाईन आली नसल्याचे क्षुल्लक कारणामुळे पुलांचे काम मागील अनेक महिन्यांपासून जैसे थे आहे. पूल लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. तो जुना पूल कमकुवत होऊन वाहतुकीसाठी असुरक्षित झाला आहे. त्यामुळे वेळीच नवीन पुलाची निर्मिती होणे गरजेचे होते. हा नवीन होणारा पूल दर्जेदार व लवकर पूर्ण झाला पाहिजे. मात्र या पुलाचे काम अद्याप रखडल्याने संताप व्यक्त होत आहे.
क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक
येथील पुलाची केवळ आठ टन भार पेलण्याची क्षमता आहे. मात्र या पुलावरुन साठ टनाची वाहतूक होत आहे. त्यामुळे हा पूल दिवसेंदिवस कमकूवत व धोकादायक होत आहे. यावर्षी देखील पावसाळ्यात नाल्यावरील पुलावरून पाणी गेले. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली. तसेच पुलावरील सिमेंटचे व लोखंडी संरक्षक कठडे वाहून गेले. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. याबरोबरच क्षमतेपेक्षा अधिक वजनाचे वाहन जाणे, पुलावरील खड्डे यामुळे पूल वाहतुकीसाठी असुरक्षित झाला आहे.
नवीन पुलामुळे येथून प्रवास करणे सुरक्षित व सुलभ होणार आहे. मात्र हे काम रेंगाळले असल्याने नागरिक व प्रवासी संतप्त झाले आहेत. फुलेनगर रेल्वेगेट ते एमआयटी काॅलेज हा रस्ता बीड बायपास या राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. तसेच दक्षिणेकडील सातारा, देवळाई व बीड बायपासकडून शहरातील रेल्वेस्टेशन, सातारा एमआयडीसी, मध्यवर्ती बसस्थानक, शासकीय व निमशासकीय कार्यालये, बँकामध्ये जाणारे प्रवासी, वाहने व मालवाहू वाहने याच मार्गावरून जातात. येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी व अवजड वाहनांची वाहतूक होते. वाहतुकीच्या दृष्टीने हा पुल अत्यंत धोकादायक झाला आहे. खड्ड्यात असंख्य वाहने आदळत आहेत.
पादचार्यांना देखील पुलावरून जीवावर उदार होऊन वाट काढावी लागते. वाहतुकीसाठी हा पूल अत्यंत धोकादायक झाला आहे. संरक्षण कठड्यांअभावी येथे अपघाताची शक्यता आहे. येथील नवीन पुलाचे काम वेळीच होणे गरजेचे होते. मात्र त्यामुळे आता वाहन चालक, प्रवासी व पादचारी यांना जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागत आहे. शिवाय पुलावरून पाणी गेल्यास प्रचंड गैरसोय होण्याची शक्यता आहे. नवा पूल होईपर्यंत किमान या जुन्या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी.