
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिडको एन-६ जकातनाका येथील एमजीएमसमोर एका भरधाव ट्रकचे स्टेअरिंग अचानक लॉक झाले. दरम्यान, अनियंत्रित झालेले हे वाहन थेट दुभाजकाला धडकले. यात दुभाजकाचा कोथळाच बाहेर पडला, मात्र दुभाजकाचे निकृष्ट काम झाल्याचा संभ्रम निर्माण करत ठेकेदारावर दबाब निर्माण करण्याचा प्रयत्न काही कार्यकर्त्यांकडून केला गेला. याऊलट ट्रकच्या धडकेत फोडलेल्या दुभाजकामुळे ठेकेदाराचेच नुकसान झाले आहे. दुभाजक फोडुन मध्यरात्री ट्रक पसार झाला. त्यानंतर सकाळी काही कार्यकर्त्यांनी फुटलेल्या दुभाजकाचे फोटो सोशल मेडियावर व्हायरल करत ठेकेदाराची बदनामी करण्याचा डाव रचला. त्यात काम निकृष्ट झाल्याची पुष्टी जोडली. या प्रकारानंतर प्रतिनिधीने प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेतली. येथील व्यापाऱ्यांना विचारणा केली असता ट्रकने मध्यरात्री धडक दिल्याने दुभाजक फुटल्याचे समोर आले. प्रतिनिधीने याप्रकरणी चौकशी केली असता ठेकेदाराला अर्धवट तुटलेला कठडा तोडण्यासाठी ब्रेकरचा वापर करावा लागला. तरीही तो तुटत नव्हता. जर काम मजबुत नसते , तर त्याला ब्रेकर का वापरावे लागले, सहा मजुरांना तुटलेला कठडा ट्रॅक्टरमध्ये टाकता येत नव्हता. दुभाजकात १२ एमएमचे स्टील आहेत. काम मजबुत असल्याचे येथील व्यापारी धर्मेश देसाई यांनी सांगितले.
ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. दुपारी भर पावसात दुभाजक चांगला होता. आम्ही रात्री उशिरा दुकाने बंद केली. तेव्हा देखील दुभाजक फुटलेला नव्हता. आम्ही शहानिशा केली असता मंध्यरात्रीच्या सुमारास एका भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा काॅर्नर तुटल्याचे दिसले.. दरम्यान अनियंत्रित झालेल्या वाहनामुळे दुभाजक फुटलेला असून, यात ठेकेदाराचेच नुकसान झाले आहे. धडकेत अर्धवठ स्थितीत पडलेला दुभाजक कापण्याहाठी ठेकेदाराला ब्रेकर बोलवावे लागले. ब्रेकरने देखील तो कापता येत नव्हता त्यामुळे काम निकृष्ट आहे, असे कसे म्हणता येईल. बांधकामात उघडे पडलेले १२ एमएमचे स्टील डोळ्यासमोर दिसत आहे. रेडिमिक्स काँक्रिटही हवी आहे. याउलट ठेकेदाराची बदनामी करणाऱ्यांना कुण्या राजकीय पुढाऱ्याचा आशीर्वाद तर नाही ना, अशी चर्चा परिसरात होत आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी देखील विशेष तपासणी केली असता मानकाप्रमाणेच काम असल्याचे समोल आले.
.... तर प्रकल्प पुर्ण करण्यासाठी कोण येणार
छत्रपती संभाजीनगरात एखाद्या कामाचे टेंडर प्रसिद्ध झाले. ठेकेदाराची निवड झाली, काही टक्के काम पुर्ण झाले की, संबंधित विभागांना पत्र व्यवहार केला जातो. तक्रारींचा ससेमिरा लावला जातो. यंत्रणेतीलच काही झारीतल्या शुक्राणूंमार्फत ठेकेदाराला तक्रारदाराचे नाव आणि नंबर देऊन काय असेल त्याचे निपटून टाका. तसा आकडा देखील कळवला जातो. असल्या ब्लॅकमेलिंगमुळे या शहरात कुठल्याही प्रकारे ठेकेदार पुढे येत नाहीत. सारखे रिटेंडर काढण्याची वेळ या गैरप्रकारामुळेच येत असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.
टेंडरनामाचा इमाने ईतबारे कारभार
या प्रकरणात टेंडरनामाला खोटी माहिती देण्यात आली. त्यात दोन दिवसापूर्वीच ठेकेदाराने दुभाजकात काळी माती टाकली होती. शुक्रवारी दुपारी झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे दुभाजकातील माती सेट झाली. त्यानंतर दुभाजकाचे काॅर्नर उन्मळून बाहेर फेकले गेल्याचा बनाव निर्माण करत कार्यकर्त्यांनी दुभाजकाच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण केले. प्रतिनिधीने आलेल्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी तेथील घटनास्थळ गाठले. दरम्यान पाऊस साडेबारा ते एकच्या दरम्यान होता. नंतर ढगाळ वातावरण होते. यावेळी दुभाजक पडलाच नाही. पडलाच असता, तर साराच आडवा पडला असता, रात्री आम्ही दुकाने बंद केल्यावर दुभाजकाचा काॅर्नर चांगला होता. सकाळी दुकाने उघडायला आलो तेव्हा कार्नर तुटला होता. आम्ही शहानिशा केली असता भरधाव वाहनाच्या धडकात तो पडल्याचे दिसले. जड वाहनाच्या धडकात कालच जुन्या मोंढ्यात लाखोचे नुकसान झाले, मग ते खाजगी घर कुणी निकृष्ठ बांधले होते काय ? असा प्रतिसवाल करत नागरिकांनी दुभाजकाचे काम कसे मजबुत आहे ते देखील सांगितले.
शहानिशा करा मग व्हायरल करा
आजकाल सरकारी कामात कुठे काय थोडा डाग दिसला, की कुठलीही शहानिशा न करता लगेच व्हायरल केले जाते. यामागे चांगला उद्देश नसतो. या घटनेची शहानिशा करणार्या टेंडरनामा प्रतिनिधीचे देखील येथील नागरिकांनी कौतूक केले. कुठलीही शहानिशा न करता थेट फोटो व्हायरल करून कुणाची खोटी बदनामी केल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतो. यामुळे या शहरात चांगले प्रकल्प पुर्ण करण्यासाठी ठेकेदार पुढे येत नाहीत. परिणामी शहराच्या विकासाला बाधा पोहोचतो, असे जकातनाका परिसरातील व्यापाऱ्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
तपासात सत्य समोर आले.
येथील मुख्य बाजारपेठेतील काही व्यापार्यांनी एकेठिकाणी दुभाजक पंक्चर करण्यासाठी ठेकेदारावर दबाब निर्माण केला होता. मात्र दुभाजक पंक्चर केले तर आधी थेट ठेकेदारांवरच गुन्हे मग पंक्चर करणार्यांवर कारवाई करणार, असे पालिका प्रशासक तथा आयुक्त डाॅ. अभिजित चौधरींचे आदेश आहेत. त्यामुळे येथील काही व्यापारी आणि ठेकेदाराचा वाद होता. ठेकेदार जुमानत नसल्याने अखेर व्यापाऱ्यांनीच ठेकेदाराला न विचारता व महापालिकेची परवानगी न घेता दुभाजक पंक्चर करून मोठे खिंडार पाडले. येथील व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराची ठेकेदाराने महापालिकेत तक्रार करू नये, यासाठी त्याची खोटी बदनामी केल्याचे धक्कादायक वास्तव टेंडरनामा तपासात समोर आले आहे.