छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याच नावाने सिडको बसस्थानक परिसरातील जालनारोडवर मोठे महाविद्यालय आहे. मराठवाड्यातील तांडा - वाड्यावरची व ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील मुले या महाविद्यालयात शिक्षण घेतात, त्याच महाविद्यालयापासून पाचशे मीटर अंतरावरील जालना रोड येथील सिडको उड्डाणपुलाच्या खाली वसंतराव नाईक यांचा पुतळा असून, पुतळा रस्त्याच्या मधोमध येऊन वाहतुकीला मोठी अडचण येत होती. शिवाय वाहनांच्या धुरामुळे व मातीमुळे त्यांच्या या पुतळ्याची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. रात्री अपरात्री येथे अपघाताचा धोका असल्याने व वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुतळ्याचे स्थलांतर करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला होता.
यासाठी सव्वा कोटीची तरतूद करण्यात आली होती. यासाठी पर्यायी जागा व प्रकल्प व्यवस्थापक व कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र प्रत्येक वेळी तांत्रिक कारण पुढे करत काम रखडल्याचे टेंडरनामाने चव्हाट्यावर आणले होते. यानंतर कामात हलगर्जीपणा करणाऱ्या प्रकल्प व्यवस्थापकाची हकालपट्टी करून दुसऱ्या प्रकल्प व्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आता काम युध्द्पातळीवर सुरू असल्याचे टेंडरनामा पाहणीत आढळून आले आहे.
नाईकांचा पुतळा सिडको उड्डाणपुलाखाली रस्त्याच्या मधोमध असल्याने येथील अपघात व वाहतुककोंडी टाळण्यासाठी पुतळा स्थलांतरित करण्यासाठी तत्कालीन महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांण्डेय यांनी निर्णय घेतला होता. यासाठी या पुतळ्याचे सौंदर्यीकरण व पुतळा स्थलांतरित करण्यासाठी सिडको बसस्थानक लगत हरितपट्ट्याच्या जागेची निवड करण्यात आली होती.
सदर पुतळा स्थलांतरित करण्यासाठी व जागेचे सुशोभीकरण करण्यासाठी एका प्रकल्प व्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु सदर प्रकल्प व्यवस्थापक व महानगरपालिका प्रशासन लक्ष द्यायला तयार नसल्यामुळे कंत्राटदाराची अडचण झाली होती.
या रखडलेल्या कामाबाबत टेंडरनामाने सातत्याने वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर अखेर प्रशासनाने आधीच्या प्रकल्प व्यवस्थापकाची हकालपट्टी करून दुसऱ्याची निवड केली. त्यामुळे कंत्राटदाराने पुतळ्याचे काम तातडीने सुरू केले असून, पुतळ्याचा चबुतरा आणि त्यामागील भिंतीचे काम युध्दपातळीवर सुरू केले आहे. आता कंत्राटदार, नव्याने नियुक्त करण्यात आलेला प्रकल्प व्यवस्थापक व कंत्राटदार व महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी ताळमेळ ठेऊन सौंदर्यीकरणाचे काम करत असल्याने सध्या तरी उत्तम रीतीने काम पार पाडीत असून, या पुतळ्याच्या कामाची पाहणी टेंडरनामा प्रतिनिधीने केली असता आसपासच्या नागरिकांनीही समाधान व्यक्त केले.