Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहरातील 'त्या' उड्डाणपुलाला मुहूर्त कधी लागणार?

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : दिवसा गणिक वाढणारी वाहनांची संख्या आणि चुकीच्या डिझाइननुसार बांधलेल्या 'राष्ट्रीय मृत्युचा महामार्ग' अशी ओळख निर्माण झालेल्या बीड बायपास रस्त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी देवगिरी महाविद्यालय ते सातारा रेल्वेस्टेशन एमआयडीसी राज्य वखार महामंडळ ते निर्लेप कंपनी ते कमलनयन बजाज हाॅस्पीटल दरम्यान शहरातील बीड बायपासला जोडणारा चौथा उड्डाणपूल लवकरच तयार केला जाणार, अशी घोषणा तत्कालीन महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ डाॅ. अभिजित चौधरी यांनी केली होती.

दरम्यान मागील वर्षी अंदाजपत्रकात १५ कोटीची तरतूद देखील करण्यात आली होती. पुलाचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्यासाठी नाशिकच्या एका प्रकल्प व्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र पुढे पुलाच्या बांधकामासाठी अद्याप टेंडर काढण्यात आले नाही. यावर्षी अर्थसंकल्पात देखील १५ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र १५ कोटीत पुलाचे बांधकाम होणार कसे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

Sambhajinagar
Samruddhi Expressway: गोंदिया जिल्ह्यासाठी Good News! 'या' 23 गावांतील जमिनीला येणार सोन्याचा भाव

टेंडरनामाने यासंदर्भात काही तज्ज्ञांशी चर्चा केली असता या प्रस्तावित उड्डाणपुलासाठी महानगरपालिकेने राज्य सरकारच्यामार्फत रेल्वे बोर्ड तसेच केंद्र शासनाच्या "मिनीस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हार्बर' यांच्याकडे प्रस्ताव पाठविणे अपेक्षित आहे. त्यांच्याकडून निधीसाठी मान्यता मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे उड्डाणपूल निर्मितीकडे सकारात्मक वाटचाल सुरू होईल.‌ महानगरपालिकेचे उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ पाहता हा पूल महानगरपालिकेकडून उभारणी होऊच शकत नाही, असे तज्ज्ञ ठामपणे सांगत आहेत.

बीड बायपासवर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे, शिवाजीनगर भुयारी मार्गाचे त्रांगडे कायम आहे. कधी भुयारी मार्गाची उंची तर कधी वाणी मंगल कार्यालयासमोरील चौक जाऊ नये, यासाठी चौकाच्या नावाखाली काही व्यापारी राजकारणमध्ये आणून प्रशासनाची कोंडी करत काम बंद पाडत आहेत.‌ परिणामी भुयारी मार्गाच्या कामात अडथळा येत असल्याने बीड बायपास, संग्रामनगर उड्डाणपुलावर वाहतुकीची कोंडी होत आहे.‌ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक प्रकल्प शाखेने बीडबायपासचे ३० मीटर रुंदीतच जोड रस्ते काढले. त्यामुळे धावपट्टीवरील इतर रस्त्यांची रुंदी कमी झालेली आहे.

महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात बीड बायपास ६० मीटर रूंदीचा दर्शविण्यात आला आहे. मात्र रस्ता कागदावरच आहे. अतिक्रमण हटाव  मोहिम राबविण्यात आली असताना महानगरपालिका हद्दीतील दोन्ही बाजूने १५ मीटर रस्ता रुंद केला नाही.‌ आता महानगरपालिका प्रशासनाला सर्व्हिस रस्ता करणे शक्य नाही. त्यामुळे बीड बायपास रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.

बायपासवरील‌ संग्रामनगर, देवळाई व एमआयटी चौक, उड्डाणपुलाखालून सातारा - देवळाईत मार्गे काढावा लागतो. मात्र या पुलांचे काम देखील चुकीचे झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.‌देवळाई, आमदार रोड हे याभागातील मुख्य बाजारपेठेचे मार्ग आहेत. यातही भाजीपाला, फळ मार्केट आणि मुख्य किराणा बाजारही या भागात आहे. बीड बायपास पासून या रस्त्यांचा लचका तोडल्याने वाहनधारक आगीतून फोफाट्यात पडले आहेत. रेणुकामाता मंदिर कमान ते अहिल्याबाई होळकर चौक ते सोलापूर धुळे, देवळाई रोड, आमदार रोड या भागातील महत्वाचे रस्ते आहेत. या रस्त्यांची रुंदी वाढविणे गरजेचे असल्याची सातारा - देवळाईकर मागणी करत आहेत.रूंदीकरण तर सोडाच या रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणांचा फाफटपसारा काढायलाही महानगरपालिका प्रशासनाला शक्य राहिले नाही.

Sambhajinagar
Nashik : ड्रायपोर्टच्या रस्त्यासाठी भूसंपादनाचे दर जाहीर; हेक्टरी 70 लाख ते 1 कोटी रुपये देणार

दुसरीकडे बीड बायपासवर देखील  दिवसभर वाहनांची गर्दी राहते. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी दिसून येते. या कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तत्कालीन महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ डाॅ. अभिजित चौधरी यांनी देवगिरी महाविद्यालय  ते नागपुरी गेटपर्यंत उड्डाणपूल निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडला होता. यासोबतच बीड बायपासच्या दोन्ही बाजुने १५ मीटर सर्व्हिस रस्ता मोकळा करण्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता.

या कामांपैकी उड्डाणपूल हा गरजेचा असल्यामुळे  या उड्डाणपुलाचा प्रस्ताव तयार करण्याचे त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते.‌ त्यासाठी निधी राखीव ठेवला होता. मात्र पुढे हालचाली झाल्या नाहीत. चौधरी यांच्यानंतर आलेल्या जी. श्रीकांत यांनी देखील तोच पायंडा पाडला. चालु वर्षीच्या अर्थसंकल्पात १५ कोटीची तरतूद करण्यात आली. पण अद्याप उड्डाणपुल उभारण्याच्या हालचाली थंडबस्त्यात आहेत.‌

जर सातारा- देवळाई - बीड बायपासकरांसाठी महानगरपालिकेला प्रामाणिकपणे काम करायची इच्छा असेल, तर मिनीस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हार्बर यांच्याकडे प्रस्ताव पाठवावा, या  कामाच्या पूर्णत्वासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील ही बाब स्पष्ट करावी. तरच बीडबायपासला जोडणारा चौथा उड्डाणपूल तयार होईल.

या उड्डाणपुलाच्या कामाबाबत नितीन गडकरी यांनी सुद्धा सकारात्मक पाउल उचलणे गरजेचे आहे. जर महानगरपालिकेने उड्डाणपुलाचा प्रस्ताव मिनीस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हार्बरकडे पाठवल्यास तत्त्वत: मान्यता मिळून देणे शहरासाठी महत्वाची बाब होईल. त्यामुळे उड्डाणपूल निर्मितीच्या आशा पल्लवित होतील. मिनीस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हार्बरकडून  सर्वेक्षणासाठी मंजुरी व प्रशासकीय प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील प्रयत्न केल्यास हे सहज शक्य होईल.

हा उड्डाणपूल झाल्यास कमलनयन बजाज हाॅस्पीटल चौकाचौकातून शहरात जाणाऱ्या वाहनांना किंवा थेट मध्यवर्ती बसस्थानक, घाटी, जालनारोडकडे  जाणाऱ्या नागरिकांना संग्रामनगर , रेल्वेस्टेशन उड्डाणपुलावरून अथवा फुलेनगर रेल्वेगेटकडून जाण्याची गरज राहणार नाही. बीड बायपास पासून हा उड्डाणपुल थेट राज्य वखार महामंडळाकडून उतरवण्यात येणार आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com