
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : स्मार्ट सिटी कार्पोरेशन लिमिटेड प्रकल्पांतर्गत शहरातील पहिल्या टप्प्यातील २२ व्हाईट टाॅपिंग रस्त्यांवर 'टेंडरनामा'ने सातत्याने वृत्तमालिका प्रकाशित करत ताशेरे ओढले. मात्र आतापर्यंत स्मार्ट सिटी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला अभय दिले. दुसरीकडे 'तु मार मी रडल्यासारखे करतो' असे म्हणत प्रकल्पातीलच काही अधिकाऱ्यांकडून हुशार झालेल्या ठेकेदाराने स्मार्ट सिटीवरच गंभीर आरोप करत पुढील रस्त्यांची कामे थांबवण्याचा इशारा दिला होता. याचा 'टेंडरनामा'ने खरपुस समाचार घेताच महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ डाॅ. जी. श्रीकांत यांनी शनिवारी सकाळीच स्मार्ट सिटी अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या अत्यंत निकृष्ट रस्त्यांची पाहणी केली.
नागरिकांचे निकृष्ट कामाकडे बोट, प्रशासकांचा चढला पारा
दरम्यान, आसपासच्या नागरिकांनी देखील नव्यानेच झालेल्या पण काही दिवसातच उखडलेल्या या रस्त्यांकडे बोट दाखवत डाॅ. जी. श्रीकांत यांच्याकडे निकृष्ट कामाबाबत कैफियत मांडली. दरम्यान नव्याकोऱ्या रस्त्याची स्थिती पाहुण श्रीकांत यांचाही पारा सरकला होता. दरम्यान ठेकेदारामार्फत तातडीने खराब रस्त्यांची दुरूस्ती करण्याच्या सुचना जी. श्रीकांत यांनी संबंधित महापालिका व स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आता जी. श्रीकांत निकृष्ट कामावर दुर्लक्ष करणारे संबंधित अधिकारी व ठेकेदारावर नेमकी काय कारवाई करतात, याकडे 'टेंडरनामा'चे लक्ष आहे.
'टेंडरनामा'चे वृत्त आणि पाठपुराव्यानंतर प्रशासक जी. श्रीकांत यांनी शनिवारी सकाळी ६ वाजेपासूनच अधिकाऱ्यांचा भलामोठा ताफा सोबत घेत स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या नवीन रस्त्यांची पाहणी केली. ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट पद्धतीने तयार केलेल्या जवाहर कॉलनी पोलिस स्टेशन ते सावरकर चौक या रस्त्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी रामायण हॉल उल्का नगरी ते विभागीय क्रीडा संकुल व विवेकानंद चौक ते अग्निहोत्र चौक या रस्त्यांची पाहणी केली.
काय दिल्या सूचना
● स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे बांधकाम करताना नागरिकांना पर्यायी रस्ता देणे.
● ,नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा, याची खात्री करा. रस्ते बांधकाम करताना जलवाहिनी, ड्रेनेजचे व इतर नागरी सुविधांची देखभाल दुरुस्ती करता येईल, अशी सुविधा निर्माण करा.