छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर काही महिन्यांपासून विविध अपघातात काहींना जीव गमवावा लागला तर काही जखमी झाले. छत्रपती संभाजीनगरकरांनी शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेबद्दल व्यक्त केलेले आश्चर्य आणि "टेंडरनामा"ने टाकलेला प्रकाश या साऱ्या घडामोडीनंतर अखेर महापालिका प्रशासनाने रस्त्यांचे काम हाती घेतले असून खड्डे आणि आरपार नाल्या बुजवायला अखेर मुहूर्त लागला आहे. मात्र शहरातील फुटपाथ आणि उघड्या नाल्यांवरील मलनिःसारण वाहिन्यांचे मेनहोल कधी बुजवणार ते टेंडरनामा पाहणीत समोर आले आहे. येत्या १५ दिवसात पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे या उघड्या मेणहोलमुळे छत्रपती संभाजीनगरकरांची फसगत होऊ शकते.
शहरातील सिडको-हडकोसह, जीएसटी कार्यालयासमोरील पत्रमहर्षी बाबा दळवी मार्ग ते अग्रसेन चौक, जकात नाका, टिव्ही सेंटर, जयभवानीनगर चौक ते गजानन मंदिर चौक, सेव्हनहिल ते सुतगिरणी चौक या विविध ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी मजीप्रा नियुक्त कंत्राटदार जीव्हीपीआरने खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण केले होते. शहरातील प्रत्येक रस्त्यांवर कंत्राटदाराने जलवाहिनीसाठी आरपार नाल्या खड्ड्यांमुळे नाहक जीव जात होते. बहुतांश नागरिक अधू झाले. दररोज गाड्या नादुरुस्त होत होत्या. वाढत्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाल्याने वाहन चालकांचे कंबरडे मोडले होते. आरपार नाल्या आणि रस्त्यावरील खड्डे मोठी डोकेदुखी बनली होती. मात्र, मजीप्रा नियुक्त कंत्राटदार जीव्हीपीआरने जलवाहिनी दरम्यान झालेल्या ह्या नाल्या आणि खड्ड्यांकडे हेतुपुरस्सररित्या डोळेझाक केली जात होती. यासंदर्भात प्रतिनिधीने सातत्याने पाठपुरावा केला असता कंत्राटदारामार्फत महापालिकेकडे बोट दाखवले जात होते. तर मजीप्राचे कार्यकारी अभियंता टेंडरमध्ये रस्ते दुरूस्तीची तरतूद असल्याचे सांगत प्रत्यक्षात दुर्लक्ष करत होते. दुसरीकडे महापालिका प्रशासन दुरूस्तीची जबाबदारी कंत्राटदाराचीच असल्याचे म्हणत रस्ते दुरूस्तीकडे कानाडोळा करत होते.
जलवाहिनी टाकण्यासाठी शहरातील तब्बल १२५० किलोमीटर रस्त्यांचे खोदकाम करत रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेला जबाबदार असलेल्या मजीप्रा आणि जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराकडून कुठल्याही उपयोजना आखल्या नसल्याने त्या बद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते. त्या पार्श्वभूमीवर आता रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र हे काम करत असताना शहरातील, दिशादर्शक फलक, दुभाजकावरील वाढलेली झाडे, स्पीडब्रेकर, व्हाईट साईड पट्टी, साईडपट्ट्या मजबूत करणे, वळणे, धोकादायक ठिकाणे व अपघातग्रस्त ठिकाणी सूचनाफलक लावणे, उताराच्या व वळणाच्या ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना करणे, विविध ठिकाणी रेडियम लाईट तसेच रस्त्यांच्या दुतर्फा पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी स्ट्राॅम वाॅटर यंत्रणा कार्यान्वित करणे, अशा विविध आवश्यक बाबींकडे महानगरपालिका प्रशासनाने पूर्तता केल्यास भविष्यातील अपघात कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शहरातील १५० कोटी आणि २०० कोटीतील झालेले रस्ते आणि स्मार्ट सिटीतून होत असलेल्या ३१७ कोटींच्या रस्त्यांवर उपाययोजनांची गरज आहे. सोबतच शहरातील तब्बल साडेचार हजार उघडे मेनहोल झाकणे गरजेचे आहे.