Sambhajinagar : हातपंप दुरूस्तीसाठी महापालिका कधी लक्ष घालणार; नागरिक त्रस्त

Handpump
HandpumpTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरात काही भागात नळाद्वारे पाणीपुरवठा होत असताना शहरातील सातारा-देवळाई, मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसर तसेच इतर भागातील नागरिक अजूनही नळाचे पाणी कधी मिळणार याची वाट पाहात आहेत. नळाद्वारे पाणी मिळत नसणाऱ्या भागातील नागरीकांसाठी हातपंपांचा मोठा आधार आहे. परंतु दुरुस्ती अभावी अनेक हातपंपाची दुरवस्था झाली आहे. तर महापालिकेकडे दुरूस्तीसाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने तसेच  दुरुस्तीच्या साहित्यासाठी पुरेसा निधी नसल्याचे कारण पुढे करत हातपंपाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांना खाजगी टॅंकरचालकांची विनंती करत पाण्यासाठी पदरमोड करावी लागत आहे.

Handpump
Sambhajinagar : वसाहतींमध्ये नागरिकांचा जीव धोक्यात?; खड्डे अन् त्यात पावसाचे पाणी

महापालिकेने कोट्यवधी रूपये खर्च करून शहरातील दहा वार्डातील ११८ प्रभागात १२६५ हातपंप हातपंप बसवले आहेत. एका हातपंपासाठी किमान ९० ते ९५ हजार रुपये खर्च येतात. त्यातील बिघाड झालेल्या हातपंपांच्या दुरूस्तीसाठी अंदाजे पाच हजार रूपये खर्च येतो. पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना या हातपंपाचा मोठा उपयोग होतो. यातील १८० हातपंप कायमस्वरूपी बंद आहेत.‌ ज्या ठिकाणी पाणी आहे, अशा ८५ ठिकाणी मोटारी टाकल्याने धार्मिक स्थळे, शाळा, सामाजिक सभागृहे, खुली मैदाने व‌ उद्याने व इतर वसाहतीत हातपंपाद्वारे पाण्याचा वापर सुरू असल्याचा दावा संबंधित विभागाने केला आहे. इतर ठिकाणी जवळपास १०१४ हातपंप उन्हाळ्यात कोरडे पडतात, असे महापालिकेचे म्हणणे आहे. यापैकी अनेक हातपंप रोड रूंदीकरणात, अतिक्रमणात तसेच बांधकामात गायब झाल्याचे देखील अधिकारीच सांगतात.

Handpump
Mumbai : नालेसफाईतील निष्काळजीपणा भोवला; ठेकेदारांना 31 लाखांचा दंड

गेल्या कित्येक वर्षभरापासून महापालिकेने या हातपंपांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक हातपंपांचे केवळ सांगाडेच उभे असलेले दिसत आहेत. काही हातपंप दुरूस्ती अभावी बंद आहेत.‌ काही ठिकाणी रबरी रिंगअभावी बंद आहेत, तर काही ठिकाणी बोअरवेल मधे असलेले लोखंडी पाईप, राॅड, हांडी, प्लंजर गंजून निकामी झाले आहेत. अशा हातपंपाची दुरुस्ती करावी म्हणून नागरिक महानगरपालिकेच्या हातपंप दुरूस्ती विभागाकडे अर्ज करतात. मात्र शहरातील इतक्या मोठ्या हातपंपांसाठी केवळ तीन हॅंन्डपंप गॅंग आहेत. या गॅंगमध्ये प्रत्येकी चार माणसे आहेत. आणि केवळ एकच वाहन आहे. एका हातपंपाचे वजन ८० ते १०० किलो असते. यातील जमीनीतील पाईप, राॅड आणि प्लंजर तसेच इतर साहित्य दुरूस्तीसाठी बाहेर काढताना कर्मचाऱ्यांना मोठी दमशाक सोसावी लागते. मनुष्यबळाचा तुटवडा आणि पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने दिवसभरात एका हॅंन्डपंप गॅंगद्वारे तीन ते चार हातपंप दुरूस्त केल्या जात असल्याचा दावा अधिकार्यांनी केला आहे. महापालिका पैसे देत नसल्याने हे हातपंप दुरुस्त कसे करणार असा प्रश्न या विभागातील कर्मचा-यांपुढे उभा राहिला आहे.

महापालिकेकडे पैसे नसल्याने दुरुस्तीसाठी वॉर्डात जाणारे महापालिकेचे कर्मचारी तक्रारदारांची भेट घेतात आणि दुरुस्तीच्या साहित्याअभावी हात हलवत परततात. अशा परिस्थितीत नागरिक लोकप्रतिनिधींना गळ घालून दुरुस्तीसाठी पुढाकार घेण्याची मागणी करतात. मात्र लोकप्रतिनिधींची मागणी बघु, करू म्हणत डावलतात. त्यामुळे हातपंप दुरुस्तीसाठी महानगरपालिकेची उदासीनता समोर येत असल्याचे दिसते. काही ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी हातपंप दुरुस्तीसाठी जातात मात्र, ज्याच्या दारात सार्वजनिक हातपंप आहे, ते दुरुस्तीसाठी नकार देतात. यात दिवस- रात्र खडखड आवाज येतो, लोक झुंबड करतात, गोंधळ करतात त्यामुळे हातपंप दुरूस्तीसाठी लोकांचा देखील विरोध असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी हातपंप बिघडला तर त्याला चैन, पाईप, बेल्ट, बेअरिंग अशा साहित्याची आवश्यक्ता असते तिथे महापालिका पैसे नाही असे सांगते, तर कधी मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे तर कधी वाहने नसल्याचेही कारण पुढे करते. संबंधित विभागाच्या बारा भानगडीत, मात्र नागरिकांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. काही उच्चभ्रू भागातील लोक हातपंपांचा वापर करत नाहीत. अशा परिस्थितीत २५० हातपंप दुरुस्त केल्याचा दावा बोरिंग विभागाने केला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com