Sambhajinagar : वारंवार खोदकामावर सातारा-देवळाईकर का संतापले?; बघा मनपाला काय दिला इशारा

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सातारा-देवळाई येथील रस्ते खोदताना तेथील सर्व कामे एकदाच करावीत, वारंवार रस्त्याचे खोदकाम करून नागरिकांचा पैसा खर्च करून त्यांनाच त्रास देऊ नये. अन्यथा आंदोलनाचे शस्त्र उपसले जाईल, असा इशारा देत स्थानिकांनी मनपा प्रशासनाला आता धारेवर धरले आहे. त्यासाठी सातारा-देवळाईतील नागरिक, संघटना आणि व्हॉट्सअप ग्रुपमधून या भागातील नागरिकांनी घराघरात जनजागृती सुरू केल्याचे दिसत आहे. या भागातील रेणुकामाता मंदिर ते अहिल्याबाई होळकर हा मुख्य रस्ता मागील तीन वर्षात अनेक वेळा खोदला, त्यात आता जीव्हीपीआर कंपनीने गेल्या दोन दिवसांपासून रस्त्यावर खोदकाम सुरू केल्याने आता या रस्त्याला नाल्याचे स्वरूप आलेले आहे. त्यामुळे नागरिकांनी संबंधित प्रशासनाच्या अशा गलथान कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : फुलंब्रीतील चितेपिंपळगावात भूमिगत गटारीचे काम खोळंबले; ग्रामस्थांकडून उपोषण

सातारा-देवळाई परिसरातील रस्त्यांचे पुन्हा-पुन्हा केल्या जाणाऱ्या खोदकामाला कंटाळून या भागातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागील अनेक वर्षांपासून कधी गॅस लाइन, तर कधी जलवाहिनी, तर कधी भूमिगत गटारीचे सुरू असलेल्या कामामुळे खोदकाम प्रक्रियेला वैतागून सातारा-देवळाई येथील नागरिकांनी एकदाच रस्ता खोदून त्यावरील सर्व कामे एकदाच पूर्ण करण्याची विनंती छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाला केली आहे.त्यातच रेणुकामाता मंदिर कमान ते अहिल्याबाई होळकर चौक या मुख्य रस्त्यासह सर्वच इतर रस्ते वारंवार वेगवेगळ्या कारणांसाठी खोदल्याचे अनेक प्रकार सातारा - देवळाई भागात घडत आहेत. तीन वर्षांपूर्वी या भागात भारत पेट्रोलियमच्या गॅस लाइनचे काम सुरू होते. कंत्राटदाराने सर्वच रस्ते फोडुन गॅस पाइपलाइन टाकली आणि रस्ते दुरूस्त न करताच तो निघुन गेला. अद्याप या भागात गॅसलाइनद्वारे यंत्रणा देखील कार्यान्वीत झाली नाही. त्यानंतर महापालिकेची ना - हरकत घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने कंत्राटदार जीव्हीपीआरने जलवाहिनीसाठी खोदकाम सुरू केले. पाठोपाठ महापालिकेने गुजरातच्या अंकिता कन्स्ट्रक्शन मार्फत संपुर्ण सातारा - देवळाई भागात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू केले. त्यात कंत्राटदाराने संपुर्ण परिसरातील रस्ते फोडून ड्रेनेजलाइन टाकण्याचे काम सुरू केले आहे. या परिसरात गॅस लाइन टाकणार्या कंत्राटदाराप्रमाणेच आता जलवाहिनी आणि भूमिगत ड्रेनेजलाइन टाकण्याच्या कामासाठी कंत्राटदारांनी मागील काही वर्षांपासून खोदकाम करून ठेवले आहे. ही दोन्ही कामे झाल्यावर पुन्हा रस्त्याची दुरुस्ती करून रस्ता पूर्ववत करण्यात येण्यासाठी प्रशासनाकडून कोट्यावधींची तरतूद असल्याचे सांगितले जात आहे.मात्र येथील रस्त्यांवर संपुर्णपणे चिखलदरा झालेला आहे. रस्त्यांवर पावसाचे पाणी तुंबून नदी नाल्यांचे स्वरूप आलेले आहे. त्यात कंत्राटदारांनी नागरिकांची जुनी ड्रेनेजलाइन फोडून ठेवण्याचा प्रताप केल्याने वारंवार रस्त्यांवर ड्रेनेजचे पाणी तुंबत आहे. ड्रेनेज लाईन साफ करण्यासाठी वारंवार महापालिकेला निवेदने देऊनही प्रयत्नांना अपयश येत आहे. एकीकडे महापालिका प्रशासनाने अत्याधुनिक महागडी यंत्रे सफाईसाठी आणली आहेत. मात्र सातारा - देवळाईभागात ही यंत्रणा पाठविण्यासाठी व या भागातील फुटलेल्या ड्रेनेजलाइनचे कायमस्वरूपी समस्येचे निराकरण करण्यात महापालिका प्रशासनास यश आले नाही. कारण या भागात सुरू असलेल्या भूमिगत गटारीचे काम करणारी यंत्रणाच गाळात फसत आहे.

Sambhajinagar
Mumbai : समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या 4 हजार कोटींच्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोळ; कोणी केला आरोप?

येथील रस्त्यांचे खोदकाम करताना जीतका पाइपांचा आकार आहे, तितकीच नाली खोदून पाइपलाइनचे काम करण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. मात्र कंत्राटदार गल्लीबोळात जेसीबी आणि पोकलेनचा वापर करून गरजेपेक्षा अधिकचे रस्ते फोडून रस्त्यांचे पार वाटोळे करत आहेत. सदर कामात सरकारी अनुदानातून झालेल्या ५० कोटींपेक्षा अधिकचे सिमेंट रस्ते होत्याचे नव्हते झाले आहेत. शहरात नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत व केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून अमृत - २ योजनेंतर्गत सुरू असलेल्या भूमिगत गटार योजनेतील टाकण्यात येणाऱ्या पाइपांचे काम झाल्यावर रस्ते पुन्हा दुरुस्त केले जातील, असे तोंडी आश्वासन प्रशासन देत आहे. मात्र अद्याप एकाही रस्त्याची दुरूस्ती केली जात नाहीऐ. या भागातील नागरिकांनी महानगरपालिकेला निदान तात्पुरते मुरूम तरी टाकुन द्या, अशी विनंती केल्यावर प्रशासनामार्फत गुंठेवारी भरल्याची पावती मागितली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रस्त्यांच्या मधोमध खोदकाम करून पाइप टाकल्याने पुन्हा दुरूस्तीसाठी भविष्यात होणाऱ्या रस्त्यांचे खोदकाम केले जाईल आणि नागरिकांनी कररूपी भरलेला पैसा हकनाक वाया जाईल. त्याचा नागरिकांना त्रास होईल. यापेक्षा सदर कामे रस्त्याच्या कडेला खोदकाम करून पाइप टाकावेत  अशी विनंती स्थानिकांनी प्रशासनास केली. मात्र त्याचा फारसा उपयोग होत नाही. पावसाळ्यात सुरू असलेली दोन्ही कामे तत्काळ थांबवा, अशी महानगरपालिका प्रशासनाला नागरिकांनी विनंती केली आहे. अन्यथा आम्ही आंदोलन करू असा प्रशासनास आंदोलनाचे शस्त्र उपसण्याचा इशारा दिला आहे.

काय म्हणतात संतप्त नागरिक

भूमिगत गटार व  नवीन पाणीपुरवठा योजना ही दोन्ही कामे एकाच वेळी होत आहेत.परंतु हे काम होत असताना महानगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचे अजिबात लक्ष नाही. भर पावसात रस्त्यांचे मधोमध खोदकाम करून सर्वच रस्त्यांचे वाटोळे केले जात आहे. रेणुकामाता मंदिर कमान ते होळकर चौक या वर्दळीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा चक्का जाम होतो. यापूर्वी मजीप्राने म्हाडा काॅलनीतील पाइपलाइन गॅसलाइनसाठी रस्ता फोडला. कंत्राटदाराने दुरूस्त केला नाही. त्यानंतर  ड्रेनेज पाइप टाकतांना रस्ता फोडला आहे , आत्ता जलवाहिनीसाठी रस्ता फोडल्याने दोन्ही बाजू खराब झाल्या आहेत. मात्र काम झाल्यानंतर रस्ता दुरुसतीकडे लक्ष दिले जात नाही. सातारा - देवळाई भागात सर्वत्र हीच स्थिती आहे. याकडे संबंधित विभागांनी लक्ष देणे आवश्यक आहे. सातारा - देवळाई भागातील सर्वच रस्त्यांवर महिला , शाळकरी मुले व जेष्ठ नागरिकांचे चालणे अवघड झाले आहे.

- पद्मसिंह राजपुत, उद्योजक

आधी जलवाहिनीसाठी रस्ते खोदले. त्याची दुरूस्ती केलीच नाही. आता ड्रेनेज लाईन साठी सर्व रस्ते खोदल्याने अक्षरशः सायकल देखील अवघड होऊन बसले आहे.

- हनुमंतराव सोनवने, उद्योजक

सातारा -  देवळाई सव्वा लाख लोकसंख्येसाठी मनपा प्रशासनाने कोणत्याही मुलभुत सोयी सुविधा दिल्या नाहीत. गेली कित्येक वर्ष रस्त्यांसाठी पाठपुरावा केल्यानंतर बांधकाम विभागासह मनपाने काही रस्त्यांची बांधकामे केली. आता त्याचा कसलाही विचार न करता रस्ते फोडले जात आहेत. जलवाहिनी, भूमिगत गटार आवश्यक बाब आहे, आमचा योजनेला विरोध नाही. मात्र काम झाल्यानंतर रस्त्यांची दुरूस्ती केली जात नाही. यामुळे सातारा - देवळाईकरांच्या हाल अपेष्टांमध्ये वाढ झाली आहे. आजारी रूग्ण, गरोदर मातांना रूग्णालय गाठणे अवघड झाले आहे. गल्लीबोळात घंटाघाडी देखील येत नाही. उघड्यावर कचर्याचे ढिग साचले.निदान पावसाळ्यात खोदकामं थांबवावीत व  नागरिकांच्या गैरसोयी दुर कराव्यात.

- असद पटेल, जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी

वारंवार रस्ते खोदकामाच्या मुद्द्यांवर आणि इतर पायाभुत सुविधांसाठी लवकरच सातारा - देवळाईकरांची व्यापक बैठक घेणार आहोत. सर्वाच्या साक्षीने निवेदन तयार करून महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन या भागात येऊन पाहणी करण्यासाठी निमंत्रित करणार आहोत. परिसरातील नागरिकांनी देखील आपल्या भागातील मुलभुत सोयीसुविधांसाठी एकत्र होणे गरजेचे आहे. सातारा - देवळाईचा मनपात समावेश करण्यापूर्वी बरीच आश्वासन दिली होती. त्या आश्वासनांपैकी शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्ग, बीड बायपास रस्ता,भूमिगत गटार योजना आणि नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनीची कामे मार्गी लागत आहेत. मात्र सदर विकासकामे करताना अधिकारी लक्ष देत नाही. त्यामुळे " भर अब्दुल्ला गुड थैलीमे " याची प्रचिती येते. कंत्राटदारावर कोणाचाही वचक नसल्याने टेंडरच्या अटीशर्तीनुसार‌ कामे केली जात नाहीत.

- बद्रीनाथ थोरात, सातारा - अध्यक्ष, सातारा - देवळाई विकास समिती

सामाजीक चळवळीत काम करत असताना दररोज किमान पन्नास तक्रारी येतात. भूमिगत गटार योजनेतील यंत्रणाच परिसरातील रस्त्यांच्या चिखलात फसत आहे. परिसरातील नागरिकांनी कितीही ओरड केली, तरी कंत्राटदार त्याचेच घोडे दामटवतोय. ते कुणाच्याही सुचनांचे पालन करत नाहीत. २१७ किलोमीटर खोदकाम करून त्यांना पाइप टाकुण मोकळे व्हायचे आहे. यात मुळ कंत्राटदाराने वेगवेगळ्या भागात कामे तोडुन दिल्याने अनेक सब कंत्राटदार काम करत आहेत. जनतेच्या त्रासाचा किंचितही विचार न करता मनमानी पद्धतीने काम करत आहेत आणि अशाच पद्धतीने स्वतःला अडचणीत आणत आहेत.

- अनंत सोन्नेकर

कोणत्याही योजनेच्या कामांवर संबंधित अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. कंत्राटदार चुकीच्या पद्धतीने कामे करून नागरिकांच्या त्रासात भर पाडत आहे. कुणालाही काही देणे घेणे नाही. खोदकाम करतांना काहीही नियोजन नाही. खोदकाम आटोपल्यावर पाइप टाकुन उकरलेली माती टाकुण कंत्राटदार दुसर्या भागात खोदकामासाठी जातो. पण आधीच्या खोदकामाची लेव्हल नीट करत नाहीत. पावसाळ्यात वाहने फसत आहेत. दररोज या भागात अपघात होत आहेत.

- राजीव थिटे पाटील, सामाजिक कार्यकर्ते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com