
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : पावसाळा आणि त्यानंतर परतीच्या पावसाचे कारण देत महानगरपालिकेकडून जवाहर काॅलनी ते चेतकघोडा अंतर्गत खड्डे बुजवण्याच्या कामात अडथळा असल्याचे कारण दिले जात होते. मात्र परतीचा पाऊस जाऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला आहे. तसेच नऊ दिवसांवर दिवाळीचा सण आला असतानाही या शहरातील अनेक रस्त्यांना जोडणार्या या रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांची डागडुजी करण्याकडे महानगरपालिकेतील रस्ते बांधकाम विभागातील कारभारी कानाडोळा करत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे अनेक वसाहतींच्या मधोमध असणाऱ्या वसाहतधारकांच्या नशिबी खड्ड्यांचे ग्रहण कायम आहे.
सिडको-हडको-मुकुंदवाडी-गारखेडा ते पुढे उस्माणपुरा आदींसह अनेक भागांना जोडणाऱ्या त्रिमुर्ती चौक ते चेतक घोडा या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजुने मोठी बाजारपेठ आहे. टिळकनगर, गारखेडा, उत्तमनगर, वसंतनगर, शांतिनिकेतन काॅलनी, जवाहर काॅलनी, सिंधी काॅलनी व अन्य शेकडो भागातील आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी त्रिमुर्ती चौक ते चेतकघोडा हा अंत्यंत महत्वाचा रस्ता आहे. याच मार्गावर अनेक रूग्णालये व धार्मिक स्थळ आहेत. त्यामुळे या मार्गाचा वापर चाकरमान्यांसह ग्राहकांचा वाढला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील रहदारीतही भर पडली आहे. मात्र, गत तीस वर्षांपासून या रस्त्याची पुरती दुर्दशा झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या प्रवासाच्या वेगालाही ब्रेक लागला आहे. रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने सोयीस्कर असलेला रस्ता सध्या जागोजागी खड्ड्यांमुळे कोंडीचे जंक्शन ठरत आहे. त्यात रस्त्यात जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा खड्ड्यात कायम मुक्काम वाढल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
जागोजागी अर्धा फुटाहून अधिक खोल खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत. त्यात रात्रीच्यावेळी या मार्गावरील कंत्राटदाराने बसवलेले अनेक एलईडी दिवे बंद असतात. त्यामुळे वेगाने येणारी चारचाकी आणि दुचाकी वाहने खड्ड्यांत आदळल्याने वाहनांचे नुकसान आणि प्रवाशांच्या अपघातांचे कारण ठरत आहेत. त्यामुळे रस्ता होईल तेव्हा होईल निदान या रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजवण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून परतीच्या पावसानेही उसंत घेतली असतानाही महापालिकेकडून या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे धुळीचाही त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. शिवाया दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात सताड उडणाऱ्या धुळीमुळे व्यापारी देखील त्रस्त झाले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात संध्याकाळच्या वेळेस या महत्त्वाच्या चौकात खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावत आहे. एन दिवाळीच्या काळात खड्डेमय रस्ता आणि धुळीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक पालिकेविरोधात संताप व्यक्त करत आहेत.