उड्डाणपूल होईल तेव्हा होईल, निदान आहे ते रस्ते तरी दुरूस्त करा

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीला ६५ वर्षांचा इतिहास आहे. ती ३४ एकर परिसरात विस्तारलेली आहे. या वसाहतीतील बहुतांश उद्योग हे स्थानिक उद्योजकांचे आहेत. चिकलठाणा, वाळूज, पैठण आणि शेंद्रा या औद्योगिक वसाहती नंतर झाल्या आणि मागून येऊनही तुलनेने त्यांचा अधिक विकास झाला. मात्र, रेल्वस्टेशन औद्योगिक वसाहतीला कायम सापत्न वागणूक मिळाली. या औद्योगिक वसाहतीला कुणीही वाली उरला नाही.‌ त्यामुळे आजही या ठिकाणी अगदी पथदिव्यांपासून ते रस्ते आणि कचर्याचे ढीग आणि उड्डाणपुलापर्यंतच्या अनेक छोट्या मोठ्या समस्या कायम आहेत.

Sambhajinagar
Mumbai : 'मेट्रो-3'चा अटकेपार झेंडा; 'वर्ल्ड टनेल काँग्रेस 2024' मध्ये केस स्टडीज सादर

या औद्योगिक वसाहतीतील उद्योजक लाखो रुपयांचा कर महापालिकेला देतात.‌ तरीही येथे कुठल्याही मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. या ठिकाणी ग्राइंड मास्टर, रुद्राणी कन्स्ट्रक्शन, त्रिमूर्ती फूड्स, निर्लेप, ऋचा इंजिनिअर्स, उमा सन्स, ठक्कर फर्निचर, कूल इंजिनिअरिंग, व्यंकटेश मुद्रणालय यासह अनेक छोटे मोठे उद्योग आहेत. काही उद्योगांना तर ६५ वर्षे पूर्ण झाली आहेत, पण कुठल्याही सुविधा नसतानाही हे सगळे उद्योगसमूह आज इतक्या वर्षांनंतरही तग धरून आहेत हे विशेष. रेल्वेस्टेशन एमआयडीसीच्या पलीकडे मोठी नागरी वसाहत झाली आहे. बीड रोड, सातारा, महानुभाव आश्रम, कमलनयन बजाज रुग्णालयाकडे जाण्यासाठी रेल्वे फाटकावर नेहमी गर्दी होते. रोज किमान १५ हजार लोकांना ताटकळावे लागते. या भागातच महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांचीही मोठी अडचण होते. एमआयडीसीने स्थापनेच्या वेळेपासून पुलासारख्या ज्या पायाभूत सुविधा पुरवायला पाहिजे त्या दिल्या नाहीत. विकास निधी वेळोवेळी वसूल केला. मात्र, त्याबदल्यात आवश्यक विकासकामे पूर्ण केली नाहीत. महानगरपालिकेकडे वसाहत हस्तांतरित झाली. महापालिकेने आधी जकात त्यानंतर एलबीटी आता मालमत्ता कर, तर सरकार जीएसटी  इतकी वर्षे वसूल करत आहे. ही वसुली नियमित सुरू आहे. पण तरीही या वसाहतीचा विकास झालाच नाही. या विभागाचा विकास मास्टर डेव्हलपमेंट प्लॅनप्रमाणे त्वरित पूर्ण व्हावा, अशी येथील उद्योजक व नागरिकांची मागणी आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : 26 वर्षे लोटली तरी 'या' उड्डाणपुलाकडे महापालिकेचे दुर्लक्ष

सुरवातीपासूनच या औद्योगिक वसाहतीकडे शासनाच्या सर्व घटकांनी दुर्लक्ष केले. अगदी साध्या-साध्या सुविधा या ठिकाणी अजूनही नाहीत. एवढी मोठी औद्योगिक वसाहत असूनही साधे पथदिवे लागावे म्हणून अनेक वर्षे संघर्ष करावा लागला. आता पथदिवे लागले असले तरी, ते कायम बंद असतात. त्यामुळे या भागात नेहमीच अंधार असतो. सर्व थरावर गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न होऊनही वसाहतीतील उड्डाणपुलाचे काम झालेले नाही. ६५  वर्षांपासून या पुलाची मागणी उद्योजक करीत आहेत. उद्योजकांच्या दोन पिढ्या यासाठी संघर्ष करत आहेत तरीही ही मागणी पूर्ण झालेली नाही. या औद्योगिक वसाहतीचे वैशिष्ट्य म्हणजे ती चारही बाजूंनी नागरी वसाहतीने वेढलेली आहे. या एमआयडीसीमधूनच बीड बायपाससह पलीकडच्या इतर वसाहतींकडे जावे लागते. शहराची लोकसंख्या वाढल्याने तर या पुलाची गरज आणखी प्रकर्षाने जाणवत आहे. काही भागातील अरुंद रस्ते, सततच्या कोंडीमुळे बाहेरून येणार्या शिष्टमंडळाला वळसा घालूनच या औद्योगिक वसाहतीत आणावे लागते. येथील उद्योजकांनी शहरात बदलीवर आलेल्या आजपर्यंतच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एमआयडीसीतील अधिकाऱ्यांना, रेल्वे प्रशासन व महापालिकेतील अधिकार्यांना वारंवार निवेदने दिली; पण योग्य प्रतिसाद मिळाला नाही. एवढेच नव्हे तर आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार यांनाही निवेदने दिली; पण उड्डाणपूल अधांतरीच आहे. मध्यंतरी एमआयडीसीने यासाठी निधी मंजूर केला होता, पण पुलाच्या कामाला गती मिळाली नाही त्यामुळे तो आता निधी एमआयडीसीने परत घेतला आहे. एकूणच सर्व विभागांमध्ये समन्वयाचा ‘पूल’ उभारणारे नेतृत्व नसल्याने हा उड्डाणपूल हवेतच आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : कोट्यवधींचे टेंडर काढूनही अखंड विजेचे 'महाविरण'चे नियोजन का फसले?

कधी करणार महापालिका पुलाचे बांधकाम

बीड बायपासकडे जाण्यासाठी सातारा - देवळाईकरांना संग्रामनगर व रेल्वेस्टेशन हे दोनच उड्डाणपूल आहेत. बायपासच्या पलीकडे नागरी वसाहतींचा झपाट्याने विकास होतोय. नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वेस्टेशन एमआयडीसी परिसरात रेल्वे उड्डाणपूल उभारण्याची तयारी दिड वर्षांपूर्वी तत्कालीन महानगरपालिका आयुक्त डाॅ. अभिजित चौधरी यांनी  दर्शविली होती.‌यासाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली होती.पुलासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याची सूचना चौधरी यांनी केली होती. मात्र चौधरी यांच्या बदलीनंतर पुलासाठी ठेवलेल्या निधीची तरतूद २०२४ -२५ च्या अर्थसंकल्पात पुन्हा करण्यात आली. मात्र अद्याप बांधकामाचे घोंगटे कायम भिजत पडले आहे. बीड बायपासकडे जाण्यासाठी रेल्वेस्टेशन, संग्रामनगर, शिवाजीनगर , बाळापुर फाटा रेल्वेगेट, झाल्टा फाटा ते कॅम्ब्रीज  मुख्य रस्ते आहेत. रेल्वेस्टेशन एमआयडीसी मधूनही १०० फुटांचा एक रस्ता बायपासला येऊन मिळताे. मात्र, एमआयडीसी भागात रेल्वे रूळ गेल्याने नागरिकांना ये-जा करण्यास अडचणी येत आहेत. या ठिकाणी एक उड्डाणपूल उभारला तर देवगिरी महाविद्यालयापासून नागरिकांना थेट बायपासला सहजपणे येता येईल.

विशेष बाब म्हणजे तत्कालीन महापालिका आयुक्त डाॅ. पुरूषोत्तम भापकर यांच्या काळात एप्रिल २०१० मध्ये एमआयडीसीतील निर्लेप ते कमलनयन बजाज हाॅस्पीटल (बीड बायपास) ला जोडणारा दोन्ही बाजूने मुख्य रस्ता गुळगुळीत करण्यात आला होता. रस्त्याच्या मधोमध नाल्यावर हमालवाडा, मोमीन व सिल्कमिल काॅलनीलगत दर्गा हजरत शाहशोक्ता रहे कब्रस्तानासमोर मे.रे. कंन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र गत १४ वर्षांपासून महानगरपालिकेने ना रस्त्याचे नुतनीकरण केले, ना पुलाची देखभाल दुरूस्ती केली. याशिवाय रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखालुन हमालवाडा - निर्लेप ते फुलेनगर रेल्वे गेट क्रमांक - ५३ ते मिलिंदनगर या रस्त्याची पार चाळणी झाल्याने उद्योजकांना व कामगारांसह सातारा - देवळाईसह बीड बायपासच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना कंबरतोड सोसावी लागत आहे.‌ रेल्वे रुळावरून पूल बांधल्यास व या सर्व रस्त्यांची दुरूस्ती केल्यास नागरिकांना जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे जेथे पूलाची उभारणी करावयाची आहे त्याठिकाणी दोन्ही बाजूंनी उंच टेकड्या आहेत. त्यामुळे कमी खर्चात याठिकाणी पूल होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. महानगरपालिकेचे तत्कालीन‌ आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सदर जागेची पाहणी केली होती. त्यांच्या आदेशाने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली होती.‌फुलेनगर रेल्वेगेट क्रमांक ५३ येथे  रेल्वेने भुयारी मार्गाचे काम केल्यास नागरिकांची गैरसोय देखील दुर होणार आहे. भुयारी मार्ग नसल्याने वाहनधारक अडकून पडतात. त्यामुळे रेल्वेस्टेशन एमआयडीसी परिसरात नवा उड्डाणपूल आणि फुलेनगर रेल्वेगेट येथे एकाच वेळी भुयारी मार्ग बांधण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेणे आवश्यक आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com