
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सर्वसामान्य कुटुंबांतील क्रीडापटूंना खेळाच्या दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून ज्योतीनगर भागातील जयनगरात उद्यानाच्या आरक्षित जागेवर उभारण्यात आलेल्या पालिकेच्या टेबल टेनिस हाॅलची दुरावस्था झाली आहे. या दुरावस्थेपायी येथील सर्वसामान्य खेळाडूंचा हिरमोड होत आहे. धक्कादायक म्हणजे स्पोर्ट्सच्या नावे सरकारचा कोट्यावधीचा निधी उकळून बांधलेल्या टेबल टेनिस हाॅलमध्ये आउटडोअर ट्रस्ट अंतर्गत डाॅ. जगन्नाथ दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ. दीक्षित जीवनशैली विनामुल्य सल्लाकेंद्र म्हणून दर मंगळवारी वापर केला जात आहे. परिणामी खेळाडूंवर अन्याय होत आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील ज्योतीनगर परिसरातील जयनगरात महापालिकेमार्फत येथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची उभारणी करण्यात आली. खासदार निधी आणि पालिकेच्या निधीतून उभ्या राहिलेल्या या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा मोठा गाजावाजा करत २२ वर्षांपूर्वी अनावरण करण्यात आले होते. यासाठी पालिकेने निश्चित केल्याप्रमाणे या संकुलातून बॅडमिंटन कोर्ट, जिम, बास्केटबॉल कोर्ट, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम आदी सुविधा पुरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.
मात्र, या सुविधा तर दुरच खेळाडूंना टेबल टेनिस कोर्टच्या कोणत्याही सुविधा देण्यात आल्या नाहीत. मागील २२ वर्षांपासून खेळाडूंना त्याची प्रतिक्षा करावी लागत आहे. तर दुसरीकडे हाॅलमधील स्लॅब कोसळायच्या मार्गावर असून दार-खिडक्या नादुरुस्त असल्याने विनामुल्य आरोग्य सल्ला घेणाऱ्यांची देखील ‘कसरत’ होत आहे. तसेच टेबल टेनिस हाॅलच्या नावे बांधलेल्या इमारतीवर वड, पिंपळ, औदुंबराची झाडे उगवल्याने इमारतीलाच धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने भिंतीही सर्दावलेल्या आहेत. इमारत आतुन-बाहेरून बेरंग झालेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खराब असलेल्या या इमारतीच्या आतील फरशीही फुटलेली आहे. देखभाल दुरूस्तीकडे मात्र महापालिकेचा कानाडोळा आहे.