Sambhajinagar : नियोजन शून्य कारभार; विजेचे खांब न काढताच रस्त्याचे काम सुरु

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : महावितरणचे खांब रस्त्याच्या मधाेमध ठेवून दोन्ही बाजूंनी काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले. यानंतर हा रस्ता १८ मीटरचा असल्याचे लक्षात आल्यावर मनपाने पुन्हा काही अतिक्रमण पाडली. मात्र खांबांकडे दुर्लक्ष केले. आता रस्त्याच्या बाजुला ड्रेनेजलाईन स्थलांतरीत करायची म्हणून गेल्या पंधरा दिवसापासून रस्त्याचे काम बंद करून कंत्राटदाराने यंत्रणा पसार केली आहे. लक्ष्मणचावडी कैलासनगर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या या रस्त्याचे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे. परिणामी मृत्युनंतरही ही वाट बिकट असून विशेषतः दिवाळीसारख्या सणासुदीत देखील नागरीकांना हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत.

Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar : कोट्यवधींच्या सुशोभिकरणाचे का वाजले 'बारा'? जबाबदार कोण?

मनपाच्या झोन क्र.-९ अंतर्गत लक्ष्मणचावडी ते कैलासनगर स्मशानभूमी ते एमजीएमकडे जाणाऱ्या बाराशे मी. रस्त्याला दशकापासून लागलेली घरघर मे २०२३ मध्ये सुटली. सहा वर्षापूर्वी निधी मंजूर केला, टेंडर निघाले, कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देऊनही रस्त्याचे काम सुरू होण्यास मुहूर्त लागत नव्हता. हा रस्ता अनेक अडथळ्यांच्या शुक्लकाष्ठातून सुटल्यानंतर काम सुरू झाले, मात्र त्या कामाचाही बट्ट्याबोळ मनपा , महावितरण आणि स्मार्ट सिटी कार्पोरेशन या तीन विभागातील कारभार्यांनी केला आहे. महावितरणचे खांब रस्त्याच्या मधाेमध ठेवून दोन्ही बाजूंनी काँक्रिटीकरण करण्याचा उरफाटा कारभार स्मार्ट सिटीच्या कारभाऱ्यांनी सुरू केला. त्यात काही दिवसांपूर्वी महापालिकेला हा रस्ता कुठे १८  ते कुठे २४ मीटर असल्याचा साक्षात्कार झाला. दरम्यान पंधरा दिवसापूर्वी शहर विकास आराखड्यानुसार रस्त्याची मोजणी सुरू करण्यात आली. त्यानंतर नगर रचना विभागामार्फत नव्याने मार्किंग करून अतिक्रमण विभागामार्फत अतिक्रमण काढण्यात आले. याकामात ड्रेनेजलाईन आणि नळकनेक्शनचे वाटोळे करण्यात आले. मात्र रस्त्याच्या मधोमध महावितरणच्या खांबांकडे कानाडोळा करण्यात आला. महापालिका, स्मार्ट सिटी कार्पोरेशन आणि महावितरणचा असमन्वय आणि नियोजन शुन्य कारभाराचा फटका कंत्राटदाराला बसला. गत पंधरा दिवसापासून त्याने काम बंद करून यंत्रणा पसार केली. रस्त्याच्या कामात होत असलेल्या विलंबामुळे ऐन दिवाळीसारख्या सणासुदीत याचा फटका प्रवाशांना बसत आहे. अद्याप मनपाने ड्रेनेज लाईनचे काम हाती घेतले नाही, त्यात रस्त्याच्या मधोमध खांब कोण काढणार, हे अनुत्तरित आहे.

Sambhajinagar
Mumbai : काम सुरू होऊन तब्बल सव्वा वर्षानंतर बीएमसीला हवा सल्लागार; 47 कोटींचे टेंडर

१८ मीटर रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणातून होत आहे. रस्त्यात येणारे महावितरणचे ३० हून अधिक खांब न काढताच दोन्ही बाजूंनी काँक्रिटीकरण सुरू करण्यात आले. आता रस्त्याचे काम झाल्यावर महावितरण खांब काढेल, तेव्हा खड्डा खोदून काढेल. तेव्हा रस्त्याची पूर्ण चाळणी होईल. कोटयावधीच्या या रस्त्यात मधोमध येणारे खांब स्मार्ट सिटी कार्पोरेशनच्या प्रकल्प व्यवस्थापकांनी काढून घेण्यासाठी प्रयत्न न केल्यामुळे हा प्रकार घडत आहे. रस्ता तयार होऊन वाहतूकीस खुला केल्यास विजेच्या खांबांमुळे अपघाताचा धोका कायम आहे. सहा वर्षापूर्वी लक्ष्मणचावडी ते कैलासनगर स्मशानभूमी ते एमजीएम या १८ मीटर व कुठे २४  रुंद आणि १२०० मीटर लांब रस्त्याच्या कामासाठी १३ कोटी ६७ लाखांत हे काम होणार होते. ए.एस.कन्सट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले होते. परंतु, त्यावेळी काम रखडले.पुढे या रस्त्याचे टेंडरच रद्द झाल्याने या  रस्त्याची किंमत वाढली. नंतर स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत केवळ लक्ष्मणचावडी ते कैलासनगर स्मशानभूमीपर्यंत एकाच टप्प्याचे काम छत्रपती संभाजीनगर येथील ए.जी.कंन्सट्रक्शन कंपनीमार्फत करण्यात येत असून कामात अनेक अडथळे येत असल्याने गत पंधरा दिवसापासून त्याने काम बंद केले आहे. आता कैलासनगर स्मशानभूमी ते एमजीएम या दुसर्या टप्प्यासाठी नव्याने टेंडर काढण्यात आले. अर्थात एकाच वेळी १३ कोटीत होणार्या कामासाठी आज २० ते २२ कोटी खर्च करूनही दिरंगाईचा फटका प्रवाशांना सोसावा लागत आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com