Sambhajinagar : कंत्राटदार, मनपाच्या वादात 1 लाख नागरिकांची प्रवासासाठी कसरत

sambhajianagar
sambhajianagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : नव्या शहरातून बीड बायपासला जोडणारा व जालना रस्त्याची कोंडी फोडण्यासाठी उत्तम पर्याय असणारा मौजे मुकुंदवाडीतील बाळापूर रेल्वेगेट क्रमांक - ५६ ते बीड बायपास या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्यावरून वाहन चालवणे जिकरीचे बनले आहे.

sambhajianagar
रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा महाराष्ट्रात होणार; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

मनपातील बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, बीड बायपास परिसरातील गांधेली, बाळापूर, आडगाव, झाल्टा, निपानी, आपतगाव, चितेगाव, सुंदरवाडी व अन्य गावातील शेतकऱ्यांना या बायपासलगत वसाहतींकडे येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या सिमेंट बायपास रस्त्यासाठी मनपा निधीतून दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

कंत्राटदाराने वर्षभरापूर्वी रस्ता खोदून खडीकरण, मजबुतीकरण देखील केले. रस्त्यालगत भूमिगत गटारीचे देखील काम केले. मात्र कंत्राटदाराचे मनपाकडे ९ कोटी रुपये थकल्याने स्वतःच्या खिशातून पदरमोड कुठपर्यंत करणार म्हणत काम थांबवले, अशी प्रतिक्रिया माजी नगरसेविका अनिता साळवे यांनी 'टेंडरनामा'शी बोलताना दिली.‌

बाळापूर रेल्वेगेट ते बीड बायपास या रस्त्याची गत कित्येक वर्षांपासून दयनीय दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावर ऐन वर्दळीच्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून वाहन उसळून अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची चाके या खड्ड्यात आदळून वाहनांचा खुळखुळा होत आहे. सोबतच वाहनावर बसलेल्यांनाही पाठीच्या दुखण्याला सामोरे जावे लागत आहे.

पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने शाळकरी मुले, आजारी रुग्ण व गरोदर मातांचे हाल होत आहेत. वसाहतीत कुणाचा मृत्यू झाल्यास दोन किलोमीटर अंतरावर बाळापूर रेल्वेगेट पर्यंत मृतदेह आणताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.

sambhajianagar
Dharashiv : 41 किमीच्या धाराशिव - तुळजापूर रेल्वेमार्गाबाबत मोठी अपडेट!

मुकुंदवाडी बाळापूर रेल्वेगेट ते बीड बायपास हा रस्ता मनपा हद्दीतच आहे. मात्र स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही या भागातील नागरिकांना चिखलाच्या दलदलीतून वाट काढावी लागत आहे. पक्के रस्तेच नाहीत. मुख्य रस्त्याचे काम रखडल्याने वसाहतीत ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याने रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाताना बांबुला कपड्याची झोळी करून नेत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयात रुग्ण घेऊन जात असतानाच रस्त्यातच रुग्ण दगावलेल्या अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यातच गरोदर महिलांना बांबूला बांधलेल्या कपड्याच्या झोळीतून रुग्णालयापर्यंत नेण्याची वेळ येत असल्याच भयाण चित्र या भागात पहावयास मिळते.

विशेष म्हणजे या वसाहतीत आमदार निधीतून बोटावर मोजण्या इतके रस्ते झालेत. पण त्या रस्त्यांना लागून असलेले रस्ते चिखलाने माखल्याने झालेल्या रस्त्यांवरचा निधी देखील वाया गेल्याचे दिसत आहे. कोट्यवधींचा निधी खर्च करून शहर सजवले. पण या वसाहती शहरात मनपा हद्दीत असूनही आजही आजारी रुग्णांना झोळीतून रुग्णालयात नेले जाते.

लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच मनपा miने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com